नगर परिषद–नगर पंचायत निवडणुका २०२५ :मतमोजणीचा दिवस पुढे ढकलला; नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार २१ डिसेंबरला मतमोजणी



 नगर परिषद–नगर पंचायत निवडणुका २०२५ :
मतमोजणीचा दिवस पुढे ढकलला; नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार २१ डिसेंबरला मतमोजणी

महाबळेश्वर प्रतिनिधी :

 राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणीचा दिवस आता पुढे ढकलण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणी ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून, त्याबाबतचे आदेश सोमवारी (दि. २ डिसेंबर) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जारी करण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगाच्या ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणीचे नियोजन करण्यात आले होते. तसेच न्यायालयीन अपील दाखल झालेल्या काही नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी आयोगाने २९ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता, ज्यानुसार त्यांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार होती. दरम्यान, रिट याचिका क्रमांक WP/7508/2025 ची नागपूर खंडपीठात २ डिसेंबर रोजी सुनावणी झाली आणि न्यायालयाने ३ डिसेंबर रोजीची मतमोजणी थांबवून ती २१ डिसेंबर रोजीच घेण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या या आदेशानुसार, पहिल्या टप्प्यातील सर्व नगरपरिषदांच्या निवडणुकांतील मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून घेतली जाणार असून, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना औपचारिक निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केलेल्या आदेशात ईव्हीएम यंत्रांची सुरक्षितता व साठवणुकीसाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदानानंतर ईव्हीएम हाताळणीसाठी २०१६ व २०२४ मधील सर्व सूचनांचे पालन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. गोडाऊनच्या साठवणुकीसाठी जबाबदार अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले असून सुरक्षा उपकरणे—सीसीटीव्ही, अलार्म सिस्टीम, फायर एक्स्टिंग्विशर, एक्झॉस्ट फॅन, व्हॅक्यूम क्लिनर इत्यादी—कार्यान्वित अवस्थेत असल्याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत. मतदान यंत्रांसाठी २४ तास सशस्त्र सुरक्षा आणि अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गोडाऊनजवळ राजकीय पक्षांनी अधिकृत केलेल्या प्रतिनिधींना पाहणीची संधी देण्यासह सर्व प्रवेशांची नोंद लॉगबुकमध्ये करणे बंधनकारक आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएमवरील ऑन-ऑफ स्विच बंद असल्याची खात्री करण्याचे आणि मतमोजणीवेळी ‘लो बॅटरी’ संदेश दिसल्यास ২০০५ च्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आयोगाने स्पष्टपणे दिले आहेत.

२१ डिसेंबर रोजी होणारी सर्व मतमोजणी प्रक्रिया नियमांनुसार आणि सुरक्षिततेसह पार पाडून तिचा अहवाल आयोगास सादर करावा, असे आदेश शेवटी देण्यात आले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ही मोठी प्रक्रिया न्यायालयीन निर्णयामुळे एकसंध करण्यात आली असून, आता सर्वच मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच पार पडणार आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl