मतदान केंद्रात मोबाईलला ‘नो एन्ट्री’; गोपनीयतेसाठी कडक नियम लागू
मतदान केंद्रात मोबाईलला ‘नो एन्ट्री’; गोपनीयतेसाठी कडक नियम लागू
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ अंतर्गत दि. २० डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र परिसरात मोबाईल फोन वापरास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेची गोपनीयता अबाधित राहावी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या सोयीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मोबाईल सुरक्षित ठेवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली ट्रे ठेवण्यात येणार असून मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी आपला मोबाईल त्या ट्रेमध्ये ठेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. मतदान झाल्यानंतर मतदारांना आपला मोबाईल परत दिला जाणार आहे.
मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल वापरताना आढळून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर निवडणूक नियमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततेत, सुरक्षित आणि पूर्ण गोपनीयतेने पार पडावी, यासाठी मतदार, उमेदवार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच सर्व संबंधित घटकांनी निवडणूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment