बोपर्डी ग्रामपंचायतीत महिला शक्तीची झेप; समृद्ध पंचायतराज अभियानात उत्साहात मशाल फेरी
बोपर्डी ग्रामपंचायतीत महिला शक्तीची झेप; समृद्ध पंचायतराज अभियानात उत्साहात मशाल फेरी
बोपर्डी (ता. वाई) ग्रामपंचायतीत महिला शक्तीचा सहभाग दिवसेंदिवस वाढत असून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत ग्रामसंस्थेने केलेल्या प्रयत्नांचे प्रत्यक्ष प्रतिबिंब आता गावात दिसू लागले आहे. अभियानातील 0.25 गुणांकनासह प्रत्येक निकष गांभीर्याने पाहत ग्रामपंचायत नियोजनबद्ध आणि परिणामाभिमुख कामावर भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार, ९ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता महिलांसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला, ज्याला गावातील महिला–माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणावर केंद्रित या मेळाव्यात बचतगट वाढविणे, नवीन बचतगटांची नोंदणी, महिला व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन, कौशल्यविकास प्रशिक्षणाची गरज, उद्योजकता संधी, महिला स्वावलंबन उपक्रम यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. गावातील सर्वच महिला संघटनांना एकत्र येऊन सामूहिक विकासाचा मार्ग आखण्यासाठी या मेळाव्याने भक्कम आधार दिला.
चर्चेनंतर उपस्थित महिलांनी एकत्र येत गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा दर्शविणारा ‘गाव नकाशा’ तयार केला. यात गावातील मूलभूत आवश्यकता, उपलब्ध संसाधने, बळकटीकरणाची गरज असलेली क्षेत्रे व आगामी उपक्रमांची नोंद करण्यात आली. ‘गाव आपला – विकास आपला’ या भावनेला अधिक धारदार बनवत त्यानंतर महिलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावातून भव्य मशाल फेरी काढण्यात आली. गावातील महिलांची एकता, ऊर्जा आणि विकास प्रक्रियेतील सक्रीय सहभाग दर्शवणारा हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला.
या कार्यक्रमाला सरपंच श्री. शंकरराव गाढवे (बापू), ग्रामपंचायत अधिकारी श्री. शंकर चिकटुळ, उमेद अभियानाचे श्री. अभंग साहेब, सीआर मनिषा गाढवे, सोनाली जाधव, ग्रामसंघाध्यक्षा विद्या खरे तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, विविध बचतगटांच्या अध्यक्षा–सचिव आणि मोठ्या संख्येने बचतगट सदस्य महिला उपस्थित होत्या. सर्वांच्या उत्साही सहभागामुळे हा कार्यक्रम ग्रामविकास, महिला नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक सकारात्मक पुढाकार ठरला, असे सर्वांनी व्यक्त केले.
महिलांना विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवून बोपर्डी ग्रामपंचायत ज्या प्रकारे सातत्यपूर्ण उपक्रम राबवत आहे, त्यातून गावाच्या सर्वांगीण प्रगतीस नवी दिशा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment