महाबळेश्वर सहलीत क्षणिक गोंधळ; अनाथ आश्रम शाळेची विद्यार्थिनी हरवली, पोलिसांच्या तत्परतेने सुखरूप शिक्षकांच्या ताब्यात
महाबळेश्वर सहलीत क्षणिक गोंधळ; अनाथ आश्रम शाळेची विद्यार्थिनी हरवली, पोलिसांच्या तत्परतेने सुखरूप शिक्षकांच्या ताब्यात
महाबळेश्वर प्रतिनिधी :
मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील माध्यमिक अनाथ आश्रम शाळेच्या शैक्षणिक सहलीसाठी महाबळेश्वर येथे आलेली तनिष्का सचिन पाटील ही विद्यार्थिनी सहलीदरम्यान क्षणिकरित्या हरवल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्थानिक पोलीस प्रशासन व एम.एस.एफ. जवानांच्या तत्पर आणि समन्वयपूर्ण कार्यवाहीमुळे विद्यार्थिनी अखेर सुरक्षितपणे तिच्या शिक्षकांच्या ताब्यात देण्यात आली.
शैक्षणिक सहलीदरम्यान काही वेळासाठी संपर्क तुटल्यानंतर तनिष्का महाबळेश्वर बस स्थानक परिसरात एकटी व घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली. बस स्थानक परिसरात गस्त घालत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने ताब्यात घेतले. विद्यार्थिनीची शांतपणे चौकशी करत शाळेचे नाव, गाव, सहलीसाठी आलेल्या बसची माहिती तसेच शिक्षकांबाबतची प्राथमिक माहिती जाणून घेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत बस स्थानक परिसर, प्रमुख पर्यटनस्थळे तसेच संबंधित मार्गांवर चौकशी वाढवली. या शोधमोहीमेत पोलीस जवान आकाश दळवी, प्रशांत पवार तसेच एम.एस.एफ. जवान अक्षय कदम व सुरज कोरडे यांनी विशेष मेहनत घेत सहलीसाठी आलेल्या बसचा शोध घेतला. त्यांच्या प्रयत्नांना यश येताच संबंधित शिक्षकांशी संपर्क प्रस्थापित झाला आणि काही वेळातच बस व शिक्षकांचा ठावठिकाणा स्पष्ट झाला.
यानंतर विद्यार्थिनीला पूर्णपणे सुरक्षित अवस्थेत तिच्या शिक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. विद्यार्थिनीला कोणतीही इजा झाली नसून ती पूर्णतः सुरक्षित असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेत पोलिस व एम.एस.एफ. जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Comments
Post a Comment