श्री क्षेत्र कुसुंबी येथे श्री काळेश्वरी देवी वज्रलेप द्वितीय वर्धापनदिनानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
श्री क्षेत्र कुसुंबी येथे श्री काळेश्वरी देवी वज्रलेप द्वितीय वर्धापनदिनानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कुसुंबी प्रतिनिधी –
श्री क्षेत्र कुसुंबी येथील श्री काळेश्वरी देवी मंदिराच्या वज्रलेपाला दुसरे वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि. ३१ डिसेंबर २०२५ व १ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, याबाबतची माहिती श्री काळेश्वरी देवी देवस्थानचे सचिव संतोष चिकणे यांनी दिली.
बुधवार दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत देवीचे मंत्रपठण होणार असून रात्री ७.३० वाजता देवीची महाआरती संपन्न होईल. त्यानंतर रात्री ९ वाजता देवीचा जागर भजन कार्यक्रम होणार आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता वेदमूर्ती विद्या वाचस्पती महेश गोविंद पाठक गुरुजी यांच्या हस्ते धार्मिक विधींना आरंभ होईल. दुपारी १२ वाजता शतचंडी महायज्ञास प्रारंभ करण्यात येणार आहे.
सायंकाळी ४ वाजता महाआरतीनंतर भाविकांना देवीच्या दर्शनाचा लाभ घेता येणार असून सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कीर्तनकार व समाजप्रबोधनकार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार सन्मानित ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे (मावली) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वज्रलेप वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री क्षेत्र कुसुंबी येथील ग्रामस्थ व देवस्थानच्या विश्वस्तांनी केले आहे.
Comments
Post a Comment