नायलॉन मांज्यामुळे जीविताला धोका; महाबळेश्वर पोलिसांचे नागरिकांना कडक आवाहन
नायलॉन मांज्यामुळे जीविताला धोका; महाबळेश्वर पोलिसांचे नागरिकांना कडक आवाहन
महाबळेश्वर प्रतिनिधी, ता. २९ —
महाबळेश्वर शहर व परिसरात पतंग उडवताना नायलॉन मांज्याचा वापर तसेच त्याची खरेदी-विक्री केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा कडक इशारा महाबळेश्वर पोलिसांनी दिला आहे. नायलॉन मांज्यामुळे निष्पाप नागरिक, दुचाकीस्वार, पादचारी यांच्यासह पक्षी व प्राणी यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.
पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांज्याचा वापर करणे, त्याची साठवणूक करणे तसेच खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारांना वेळीच आळा घालावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने पालकांना केले आहे. अनेक वेळा पाल्यांकडून नकळत किंवा जाणीवपूर्वक असे प्रकार घडत असल्याने त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नायलॉन मांज्यामुळे झालेल्या अपघातात जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्यास संबंधित पाल्यांसह पालकांवरही फौजदारी स्वरूपाची कडक कारवाई करण्यात येऊ शकते. अशा कारवाईचा परिणाम भविष्यातील शिक्षण, नोकरी तसेच सामाजिक आयुष्यावरही होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
क्षणिक आनंदासाठी किंवा निष्काळजीपणामुळे होणाऱ्या या धोकादायक कृत्यांमुळे गंभीर परिणाम ओढवू नयेत, यासाठी पालकांनी विशेष दक्षता घ्यावी, आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे आणि कायद्याचे पालन करावे, असे आवाहन महाबळेश्वर पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, नायलॉन मांज्याबाबत कोणतीही माहिती, तक्रार किंवा संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिस मदत केंद्र क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी नागरिकांनी सहकार्य करून सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment