महाबळेश्वर अर्बन बँकेला मुक्तीची झेप; रिझर्व्ह बँकेचे सर्व निर्बंध हटले, कर्ज सुविधा पुन्हा सुरू
महाबळेश्वर अर्बन बँकेला मुक्तीची झेप; रिझर्व्ह बँकेचे सर्व निर्बंध हटले, कर्ज सुविधा पुन्हा सुरू
महाबळेश्वर प्रतिनिधी–
महाबळेश्वर तालुक्यातील अर्थकारभाराची प्रमुख वाहिनी मानली जाणारी दि महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. महाबळेश्वर या बँकेवरील भारतीय रिझर्व्ह बँकेने सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क अंतर्गत लादलेले सर्व निर्बंध अखेर मागे घेतल्याने बँकेच्या कामकाजाला नवे बळ मिळाले आहे. गत चार वर्षांपासून कर्ज वितरणासह अनेक आर्थिक तरतुदी बंद असल्याने सभासदांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. तथापि, नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्ज सुविधा पुन्हा सुरू करण्याचा महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री. समीरभाई सुतार यांनी दिली.
बँकेच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेरची रिझर्व्ह बँकेकडून तपासणी आणि वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झाले असून बँकेची आर्थिक स्थिती स्थिर आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच सर्व निर्बंध हटविण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या चार वर्षांच्या कठीण काळात रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे काटेकोर पालन करीत संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांनी सातत्याने पारदर्शक, जबाबदार आणि सर्वसमावेशक कामकाज राखले असल्याचा विश्वास चेअरमन समीरभाई सुतार यांनी व्यक्त केला. कर्ज व्यवहार नियमितपणे परतफेड करणाऱ्या सभासदांनी नव्याने सुरू होणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
अर्बन बँकेवरील निर्बंध मागे घेण्यात आल्याचा निर्णय जाहीर होताच सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि स्थानिक नागरिकांनी संचालक मंडळाचे मनापासून अभिनंदन केले. गेल्या अनेक वर्षांचा ताण हलका करणारा आणि स्थानिक आर्थिक घडामोडींना गती देणारा हा निर्णय असल्याने त्याचे सर्वच स्तरांत स्वागत करण्यात आले. बैठकीस उपस्थित संचालक उपाध्यक्ष श्री. शरद बावळेकर, संचालक श्री. राजेश कुंभारदरे, श्री. दत्तात्रय वाळकेकर, श्री. सतीश औंबळे, श्री. चंद्रकांत बावळेकर, श्री. नदीम सारवान, श्री. संपत जाधव, श्रीमती उषा औंबळे, सौ. मनिषा पारठे, श्री. जावेद वलगे, श्री. अनिल साळुंखे, श्री. प्रशांत कात्रट, श्री. मिलींद ढेबे, श्री. विजयकुमार दस्तुरखे तसेच मुख्य व्यवस्थापक श्री. फकीरमोहंमद वलगे व सेवक वर्ग यांच्या उपस्थितीत घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे बँकेच्या विश्वासार्हतेत मोठी वाढ झाली आहे.
दीर्घकाळानंतर निर्बंध हटवले गेल्याने महाबळेश्वर तालुक्यातील व्यवसाय, व्यापार, शेतकरी, लघुउद्योग आणि सर्वसामान्य सभासदांसाठी आर्थिक प्रगतीची नवी दारे खुली होत असून अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने दाखवलेली कार्यक्षमता आणि चिकाटी सर्वांच्या कौतुकास पात्र ठरते.
Comments
Post a Comment