महाबळेश्वर नगरपरिषदेला अखेर हक्काचं ठिकाण; नवनिर्वाचित नगराध्यक्ष-नगरसेवकांच्या बसण्याच्या जागेचा प्रश्न मार्गी
महाबळेश्वर नगरपरिषदेला अखेर हक्काचं ठिकाण; नवनिर्वाचित नगराध्यक्ष-नगरसेवकांच्या बसण्याच्या जागेचा प्रश्न मार्गी
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच आता शहरात एक वेगळीच लगबग सुरू झाली असून ती नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या बसण्याच्या जागेसाठीची आहे. निवडणूक झाली, लोकप्रतिनिधी निवडून आले, मात्र प्रत्यक्ष कामकाजासाठी ते नक्की कुठे बसणार आणि नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी व मागण्या कुठे मांडायच्या, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण ज्या नगरपरिषदेच्या इमारतीत पूर्वी नगराध्यक्ष व नगरसेवक बसत होते, ती इमारत आतल्या बाजूने पूर्णपणे तोडून टाकण्यात आली असून तेथे सध्या वापरासाठी योग्य अशी व्यवस्था उपलब्ध नव्हती.
या परिस्थितीमुळे नवनिर्वाचित नगरपरिषदेची बॉडी स्थापन होणार असतानाच प्रशासकीय अडचणी उभ्या राहिल्या होत्या. १ जानेवारीपासून नगरपरिषदेची नवी बॉडी अधिकृतपणे स्थापन होणार असल्याने कामकाज कुठून सुरू होणार, याबाबत नागरिकांमध्येही संभ्रम होता. मात्र या प्रश्नावर आता तोडगा काढण्यात आला असून प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात जुन्याच इमारतीत नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठी बसण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार जुन्या नगरपरिषद इमारतीत आवश्यक दुरुस्ती, अंतर्गत बदल आणि बसण्याची व्यवस्था उभारण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. वेळेचे भान ठेवून हे काम जलद गतीने पूर्ण केले जात असून १ जानेवारीपूर्वी सर्व आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे नव्या नगराध्यक्षांसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना किमान तात्पुरत्या स्वरूपात तरी एकाच ठिकाणी बसून काम करता येणार आहे.
या व्यवस्थेमुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला असून आपल्या समस्या, विकासकामांच्या मागण्या आणि तक्रारी मांडण्यासाठी आता कुठे जावे, हा प्रश्न सध्या तरी सुटला आहे. दीर्घकाळासाठी नवीन आणि सुसज्ज नगरपरिषद इमारतीचा प्रश्न प्रलंबित असला, तरी सध्याच्या घडीला तरी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या बसण्याचा आणि नगरपरिषदेच्या कामकाजाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.
Comments
Post a Comment