महाबळेश्वरमध्ये निवडणूक प्रचाराचा जोर; राष्ट्रवादीची बाजारपेठ रॅली आणि लोकमित्र आघाडीची वासुदेव रॅली चर्चेचा केंद्रबिंदू

महाबळेश्वरमध्ये निवडणूक प्रचाराचा जोर; राष्ट्रवादीची बाजारपेठ रॅली आणि लोकमित्र आघाडीची वासुदेव रॅली चर्चेचा केंद्रबिंदू

महाबळेश्वर, दि. १५ (प्रतिनिधी) : 

पालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून रॅली, कोपरा सभा, रिक्षावरील स्पीकर, डिजिटल स्क्रीन असलेल्या व्हॅन अशा विविध प्रकारच्या प्रचारामुळे शहर ढवळून निघाले आहे. सर्व पक्ष व आघाड्यांचे उमेदवार आता थेट रस्त्यावर उतरले असून शहरात सर्वत्र निवडणूक वातावरण निर्माण झाले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजारपेठेतील रॅलीने तसेच लोकमित्र जनसेवा आघाडीच्या वासुदेव रॅलीने मतदारांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या दोन्ही रॅलींना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


उमेदवारांच्या अर्जांवरील आक्षेपांमुळे महाबळेश्वरची निवडणूक काही काळ लांबणीवर पडल्याने प्रचाराचा जोर कमी झाला होता. मात्र आता निवडणूक जवळ आल्याने प्रचाराने पुन्हा वेग घेतला आहे. उमेदवारांच्या प्रचारामुळे पर्यटननगरी महाबळेश्वर पुन्हा एकदा राजकीय हालचालींनी गजबजली आहे. आज शहराच्या मुख्य बाजारपेठेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदे, प्रभाग क्रमांक तीनमधील विमल पार्टे व विशाल तोष्णीवाल तसेच प्रभाग क्रमांक पाचमधील अपर्णा सलगरे व ॲड. संजय जंगम यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधत होते, तर पक्षाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हे हेवेदावे नव्हे तर विकासाला प्राधान्य देणारे राजकारण करणार असल्याचे सांगत, चुकीच्या व्यक्तीकडे सत्ता गेल्यामुळे मागील आठ वर्षे शहर विकासापासून वंचित राहिले असल्याचा आरोप करण्यात आला. विकासाचा हा आठ वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रयत्न केले जातील, असे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदे यांनी सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.


आज महाबळेश्वरकरांची सकाळ टाळ वाजवत आणि प्रचारगीते गात आलेल्या वासुदेव रॅलीने झाली. लोकमित्र जनसेवा आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डी. एम. बावळेकर व त्यांच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आघाडीच्या वतीने या अनोख्या वासुदेव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पांढऱ्या रंगाचा वासुदेवाचा पोशाख, मोरपिसांची गोल टोपी, गळ्यात तिरंगी मफलर व त्यावर आघाडीचे निवडणूक चिन्ह, हातात टाळ आणि मुखात प्रचारगीत अशा स्वरूपात दहा वासुदेव पहाटेपासून महाबळेश्वर शहरात फिरत होते. या प्रचारगीतांमुळे अनेक महाबळेश्वरकरांची झोप मोडली. टाळांचा आवाज ऐकून अनेक नागरिक दरवाजाबाहेर येत होते, तर काही खिडकीतून डोकावून पाहत होते. प्रचाराची ही अनोखी पद्धत अनेकांना भावली असून या रॅलीला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला. ही रॅली दिवसभर शहरातील सर्व प्रभागांतून फिरत लोकमित्र जनसेवा आघाडीचा प्रचार करत होती.


मागील निवडणुकीत विकासाची स्वप्ने दाखवणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाबळेश्वरकरांनी सत्ता दिली, मात्र पाच वर्षांत शहरात एकही ठोस विकासकाम झाले नाही, त्यामुळे नागरिकांची निराशा झाली असल्याचे मत लोकमित्र जनसेवा आघाडीचे योगेश बावळेकर यांनी व्यक्त केले. पुन्हा तीच मंडळी विकासाचे गाजर दाखवून मते मागत असली तरी आता महाबळेश्वरकर ही चूक पुन्हा करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असल्याने येथील प्रश्न इतर शहरांपेक्षा वेगळे आहेत. गेली अनेक वर्षे शहर विकासापासून वंचित राहिल्याने ‘आमचे नंदनवन कुठे नेऊन ठेवले?’ असा प्रश्न येथील नागरिक विचारत असल्याचे चित्र आहे. मंत्री मकरंद पाटील यांच्या भक्कम नेतृत्वाखाली काम करणारी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येणार असून पुढील पाच वर्षांत अनेक नावीन्यपूर्ण योजना राबवून महाबळेश्वरचा विकास केला जाईल. त्याचबरोबर स्थानिक युवकांच्या रोजगाराला प्राधान्य देण्याचे कामही राष्ट्रवादी काँग्रेस करणार असल्याची ग्वाही पक्षाचे तौफिक पटवेकर यांनी दिली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl