आज महाबळेश्वर पालिका निवडणुकीची मतमोजणी; सकाळी १० वाजता निकाल प्रक्रियेला प्रारंभ
कोण होणार नगराध्यक्ष ?
आज महाबळेश्वर पालिका निवडणुकीची मतमोजणी; सकाळी १० वाजता निकाल प्रक्रियेला प्रारंभ
महाबळेश्वर प्रतिनिधी , दि. २१ (प्रतिनिधी) —
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ साठी आज रविवार दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होत आहे. गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून या प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
मतमोजणी दोन फेऱ्यांमध्ये होणार असून यासाठी एकूण १० मतमोजणी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी कामकाजासाठी २ रो अधिकारी, १० मतमोजणी पर्यवेक्षक व २० मतमोजणी सहाय्यक अशा एकूण ३२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासोबतच मतमोजणीशी संबंधित अनुषंगिक कामकाजासाठी सुमारे ५० अधिकारी व कर्मचारी तैनात ठेवण्यात आले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
मतमोजणी केंद्रामध्ये केवळ उमेदवार, त्यांचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल वापरास पूर्णतः बंदी घालण्यात आली असून ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मात्र पत्रकारांना मोबाईल वापरण्यास विशेष परवानगी देण्यात आली आहे.
मतमोजणीच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले असून महाबळेश्वर क्लब चौक, श्रेयस हॉटेल, केदार हॉटेल व आर.आर. हेरिटेज हॉटेल या मार्गांवरून चारचाकी व दुचाकी वाहनांची ये-जा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच नगरपरिषद कार्यालय, पोस्ट ऑफिस व उदय हॉटेल या तीन ठिकाणांवरूनच उमेदवार, नियुक्त अधिकारी-कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी व पत्रकारांना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.
आज होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण महाबळेश्वर शहरासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांच्या निवडणुकीचे निकाल आज स्पष्ट होणार आहेत. निवडणुकीच्या निकालातून शहराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाची दिशा ठरणार असल्याने नागरिकांमध्येही निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Comments
Post a Comment