केळघर घाटातील काळा कडा बनला ‘डेथ झोन’; प्रशासनाचे दुर्लक्ष कायम, प्रवाशांत भीतीचे सावट

⚠️ केळघर घाटातील काळा कडा बनला ‘डेथ झोन’; प्रशासनाचे दुर्लक्ष कायम, प्रवाशांत भीतीचे सावट

महाबळेश्वर प्रतिनिधी : 

महाबळेश्वर–मेढा–सातारा या महत्त्वाच्या मार्गावरील केळघर घाटातील काळ्या कड्याजवळील रस्ता दिवसेंदिवस भयावह होत चालला आहे. तुटलेले कठडे, अतिशय अरुंद वळणं, धोकादायक उतार आणि रस्त्यालगत घोंघावणारी खोल दरी… अशी भीषण परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही संबंधित प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्यामुळे या घाटातून प्रवास करणाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाबळेश्वर–सातारा हा हजारो प्रवाशांचा दैनंदिन मार्ग आहे. विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, महाबळेश्वर दौऱ्यावर येणारे अधिकारी आणि पर्यटक यांची मोठी वर्दळ या रस्त्यावर असते. पुढील सगळा रस्ता रुंद आणि कॉंक्रीटचा असल्याने वाहने वेगात धावत असतात; परंतु मोळेश्वर फाटा ते काळ्या कड्यापुढील दोन धोकादायक वळणांदरम्यानचा सुमारे चार किलोमीटरचा पट्टा अचानकच अतिशय अरुंद, खाचखळग्यांनी भरलेला आणि कठडे तुटलेला असल्याने प्रवाशांची अक्षरशः धडधड वाढते. मोठ्या वाहनांना एकमेकांना ओलांडताना टक्कर होण्याचा धोका सतत असतो, तर काही ठिकाणी दरीकडे तुटलेल्या कठड्यांमुळे सरळ कोसळण्याची भीती कायम आहे.

या गंभीर परिस्थितीची दाहकता अशी की सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी अधिकारी महाबळेश्वर–प्रतापगड दौऱ्यांदरम्यान अनेकदा या रस्त्यानेच प्रवास करतात. तरीही मंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या मतदारसंघातील एवढ्या धोकादायक रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

महाबळेश्वर–सातारा मार्ग काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या हॅम योजनेतून करण्यात आला असला, तरी या चार किलोमीटरच्या पट्ट्याला वन विभागाच्या हद्दीचे कारण सांगून कामातून वगळण्यात आल्याचा मुद्दा अद्याप गूढच आहे. प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

दरम्यान, सह्याद्री ट्रेकर्सचे अध्यक्ष संजय पारठे यांनी काही दिवसांपूर्वी तुटलेल्या कठड्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो, हे लक्षात घेत तातडीने सामाजिक बांधिलकी जपत सहकाऱ्यांसह पोत्यांमध्ये माती भरून ती कठड्याजवळ उभी केली. त्यांचे हे प्रयत्न अनेकांनी कौतुकास्पद ठरवले. परंतु जवळच सुरू असलेल्या एका नामांकित कंपनीच्या भुयारी केबल कामादरम्यान कंपनीने आपल्या केबलची सुरक्षा पाहून केलेले कॉंक्रीटीकरण सोडले, तर अन्य सुरक्षा उपायांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. या धोका वाढवणाऱ्या परिस्थितीची प्रशासनाला माहिती दिली होती की नाही, हा प्रश्न कायम आहे.

स्थानिकांनी अनेकदा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले, तरीही साकबांच्या निष्क्रियतेमुळे घाटातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालली आहे. प्रशासनाची कुंभकर्णीय झोप एखाद्या मोठ्या अपघातानंतरच मोडणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सध्या काळा कडा परिसरातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून, मोठा अपघात होण्यापूर्वीच तातडीची दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने या गंभीर स्थितीकडे त्वरित लक्ष न दिल्यास कोणत्याही क्षणी मोठी मानवी हानी होऊ शकते, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl