प्रशासनाचा निष्काळजीपणा ठळक – रस्त्यांची दयनीय अवस्था, फांद्यांचे अडथळे आणि वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांची होरपळ
प्रशासनाचा निष्काळजीपणा ठळक – रस्त्यांची दयनीय अवस्था, फांद्यांचे अडथळे आणि वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांची होरपळ
महाबळेश्वर प्रतिनिधी :
क्षेत्र महाबळेश्वर रोडवर गुरुवारी दिवसभर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीने प्रशासनाचा निष्काळजीपणा, नियोजनशून्य कारभार आणि रस्त्यांच्या देखभालीतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या. तब्बल तीन-तीन तास गाड्या एका इंचानेही न हलल्याने पर्यटक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सकाळी सुरू झालेली कोंडी दुपारपर्यंत आणखी गंभीर झाली आणि पूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली. प्रशासनाकडून कोणतीच सक्रियता न दिसल्याने नागरिकांचा संताप उसळला आहे.
शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे हाल तर अधिकच चिंताजनक होते. अनेक विद्यार्थ्यांना बसमध्येच तासन्तास अडकून राहावे लागल्याने उष्णता, थकवा आणि मानसिक ताणाचा मोठा फटका बसला. शिक्षकांनी प्रशासनावर तीव्र टीका करत, “ही परिस्थिती टाळता येण्यासारखी होती. गर्दी वाढणार हे माहीत असूनही प्रशासनाची तयारी शून्य होती,” असा आरोप केला. इतकेच नव्हे, तर या परिस्थितीत प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, बिस्किटे किंवा आवश्यक मदत उपलब्ध करून देणे गरजेचे असताना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले.
स्थानीय गाईडने व्यक्त केलेली निरीक्षणे प्रशासनाच्या दुरावस्थेचा अधिक उलगडा करतात. “नगरपालिका सीमेत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात साईड पट्ट्या व्यवस्थित न भरल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक बुक होते आणि मोठी कोंडी निर्माण होते,” असे त्यांनी सांगितले. रस्त्याची रुंदी कमी होणे ही या कोंडीची मुख्य कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याहून गंभीर म्हणजे रस्त्यावर झुकून आलेल्या झाडांच्या फांद्या. योग्य वेळी छाटणी न केल्यामुळे या फांद्या बस, पर्यटकांच्या गाड्या आणि मोठ्या वाहनांसाठी अडथळा ठरत आहेत. अनेक वाहनांना या फांद्यांमुळे वेग कमी करावा लागतो किंवा रस्त्याच्या मध्यभागी सरकावे लागते, ज्यामुळे वाहतूक धीमी होते आणि रांगा वाढू लागतात. स्थानिकांनी या फांद्यांच्या छाटणीची जबाबदारी नगरपालिका आणि संबंधित विभागावर ठेवत, “हे काम वेळेत झाले असते तर कोंडी निम्म्यावर आली असती,” असे ठामपणे सांगितले.
पर्यटकांच्या गाड्या, खासगी बस, टॅक्सी आणि स्थानिक वाहतुकीच्या ताणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही पूर्वनियोजन केले गेले नाही. ट्रॅफिक पोलिसांची कमतरता, अनियंत्रित पार्किंग, रस्त्यांची अरुंद रचना आणि रस्त्यांच्या दुरुस्तीतील अर्धवट कामांमुळे सहा किलोमीटरपर्यंतच्या गाड्यांच्या रांगा निर्माण झाल्या. नागरिकांना पाणी, स्वच्छतागृहे आणि आवश्यक सुविधा दूर असल्याने त्रास दुप्पट झाला.
पर्यटनावर अवलंबून असलेल्या महाबळेश्वरमध्ये प्रशासनाची ही निष्क्रियता अत्यंत गंभीर मानली जात असून स्थानिक व्यावसायिक, पर्यटक आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “दरवर्षी हाच प्रकार. ना रस्त्यांची दुरुस्ती, ना वाहतूक नियोजन, ना कोणतीही पूर्वतयारी. पर्यटक येतात आणि त्रास घेऊन परत जातात,” अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यावसायिकांकडून देण्यात येत आहे.
महाबळेश्वरसारख्या राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळावर वाहतूक कोंडी, अपुरा रस्ता रुंदीकरण, न छाटलेल्या फांद्या आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा यामुळे आजचा संपूर्ण दिवस त्रासदायक ठरला. नागरिकांनी तातडीने रस्त्यांच्या साईड पट्ट्या भरणे, झाडांची छाटणी, वाहतूक नियंत्रण वाढवणे आणि रस्त्यांची योग्य देखभाल करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
Comments
Post a Comment