टाळांच्या गजरात वासुदेव रॅली; लोकमित्र जनसेवा आघाडीचा अनोखा प्रचार महाबळेश्वरकरांच्या चर्चेचा विषय
महाबळेश्वर, दि. १५ (प्रतिनिधी) :
पालिका निवडणुकीच्या प्रचारात लोकमित्र जनसेवा आघाडीने आज अनोखी वाट धरत वासुदेव रॅलीद्वारे शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. पहाटे टाळांचा गजर आणि प्रचारगीते गात शहरात फिरणाऱ्या या रॅलीमुळे महाबळेश्वरकरांची सकाळच वेगळ्या वातावरणात सुरू झाली.
लोकमित्र जनसेवा आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डी. एम. बावळेकर व त्यांच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आघाडीच्या वतीने या वासुदेव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पांढऱ्या रंगाचा पोशाख, मोरपिसांची गोल टोपी, गळ्यात तिरंगी मफलर व त्यावर आघाडीचे निवडणूक चिन्ह, हातात टाळ आणि मुखात प्रचारगीत अशा स्वरूपात दहा वासुदेव शहरातील विविध भागांतून फिरत होते. टाळांचा आवाज ऐकून अनेक नागरिक घराबाहेर येत होते, तर काही खिडकीतून ही रॅली पाहत होते. प्रचाराची ही पद्धत अनेकांना भावली असून शहरातून या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला.
मागील निवडणुकीत विकासाची स्वप्ने दाखवणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नागरिकांनी सत्ता दिली, मात्र पाच वर्षांत एकही ठोस विकासकाम झाले नसल्याने महाबळेश्वरकरांची निराशा झाली असल्याचे लोकमित्र जनसेवा आघाडीचे योगेश बावळेकर यांनी सांगितले. पुन्हा तेच चेहरे विकासाचे गाजर दाखवून मते मागत असले तरी आता नागरिक ही चूक पुन्हा करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही वासुदेव रॅली दिवसभर शहरातील सर्व प्रभागांतून फिरत लोकमित्र जनसेवा आघाडीचा प्रचार करत होती.
Comments
Post a Comment