शिंदीत नवी एसटी सेवा दाखल; ग्रामस्थांचे जल्लोषात स्वागत, पुणे–पिंपरी चिंचवडशी दळणवळणाला नवी दिशा
शिंदीत नवी एसटी सेवा दाखल; ग्रामस्थांचे जल्लोषात स्वागत, पुणे–पिंपरी चिंचवडशी दळणवळणाला नवी दिशा
शिंदी प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ अशा शिंदी गावाची पुणे–पिंपरी चिंचवडशी थेट दळणवळणाची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली असून नव्या एसटी सेवेला शनिवारी रात्री गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. पुणे–पिंपरी चिंचवड ते शिंदी अशी नियमित सेवा सुरू झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी याला “शिंदीसाठी ऐतिहासिक दिवस’’ अशी प्रतिक्रिया दिली.
या बस सेवेचा शुभारंभ पुणे पिंपरी चिंचवड येथून रात्री ९.३० वाजता झाला. नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सहाय्यक आगार निरीक्षक वसंत रावते, चालक चव्हाण आणि सोमनाथ महाजन तसेच वाहक वाघमारे आणि महेंद्र कोळी यांच्या उपस्थितीत पहिल्या प्रवासाचे नियोजन सुरळीतपणे पार पडले. ताम्हिणी, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड आणि खोपी मार्गे ही बस थेट शिंदीत दाखल झाली तेव्हा ग्रामस्थांनी फटाके, जल्लोष आणि जयघोषात तिचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवरांसह शेकडो नागरिक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये श्री. पांडुरंग मोरे, श्री. शिवाजी मोरे, श्री. अनंत मोरे (बाबा गुरुजी), श्री. तानाजी मोरे, श्री. रामचंद्र गाढवे, श्री. चंद्रकांत ला. मोरे, श्री. सुरेश ला. मोरे, श्री. विजय मोरे, श्री. अनिल मोरे, श्री. नंदू मोरे, श्री. विनोद मोरे, श्री. समीर जंगम, श्री. सदानंद मोरे आणि श्री. दिनेश मोरे यांचा समावेश होता. महिलांमध्ये सौ. सुनंदा मोरे, सौ. हिराबाई गाढवे, सौ. स्नेहल मोरे, सौ. विनया मोरे आणि सौ. भारती भोसले यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
ही सेवा सुरू करण्यामागे स्थानिक तरुणांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला. कांदाटी भागातील युवा कार्यकर्ते आणि नवतरुण मित्र मंडळ मौजे शिंदी मुंबईचे उपाध्यक्ष भूषण अनिलराव मोरे, नितीन सुनिलराव मोरे आणि पाठपुरावा करणारे सौरभ विनोदराव मोरे यांनी प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून ही सेवा सुरू करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. त्यांना सुरेश लाडकोजीराव मोरे, विलास गंगाराम मोरे, वैभव विनायक मोरे आणि जितेंद्र पांडुरंग मोरे यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आशिर्वादाने ही सेवा मंजूर झाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून दळणवळणाच्या सुविधांच्या अभावामुळे अडचणीत असलेल्या शिंदी ग्रामस्थांसाठी ही सेवा जणू जीवदायी ठरणार आहे. कामानिमित्त, शिक्षण, आरोग्य सेवा तसेच शहरी भागाशी नियमित संपर्क ठेवण्यास ही बस मोठा आधार ठरणार असून प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.
शिंदीत दाखल झालेल्या पहिल्या बसचे स्वागत हा संपूर्ण कार्यक्रमाचा अत्यंत भावनिक क्षण ठरला. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत ही सेवा कायमस्वरूपी आणि सुरळीत सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असून या उपक्रमामुळे शिंदी गाव आणि परिसराच्या विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment