समाज एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन; शिक्षण, संघटन आणि हक्कांसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार
मुंबई प्रतिनिधी –
संत रोहिदास समाज फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समाज बांधवांच्या एकत्रित बैठकीत एकजूट, शिक्षण आणि संघटन या त्रिसूत्रीवर भर देत विविध मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले. समाज संघटित झाला तरच हक्क मिळू शकतात, हा संदेश बैठकीत वारंवार अधोरेखित करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना पांडुरंग कारंडे गुरुजी यांनी सर्व समाज बांधवांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, युवकांनी पुढाकार घेऊन मिळून-मिसळून काम करावे आणि संघटना अधिक मजबूत करावी, असे आवाहन केले. संघटन मजबूत झाल्यास समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवणे सोपे होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजितराव भोईटे यांनी आपल्या भाषणात समाजाच्या शैक्षणिक प्रगतीवर विशेष भर दिला. समाजातील पालकांनी आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण द्यावे, उच्च शिक्षणासाठी इतर प्रदेशात पाठवण्याची तयारी ठेवावी, असे सांगत त्यांनी समाज कल्याण विभागामार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक सवलती व निधीचा योग्य पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील ज्या कुटुंबांचा सातबारा कोरा आहे, अशा कुटुंबांना शासनाकडून चार एकर जिरायत आणि चार एकर बागायत जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित कुटुंबांच्या फाईल तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवल्यास स्वतः पाठपुरावा करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सी. के. जाधव यांनी तरुण वर्गाला उद्देशून प्रभावी मार्गदर्शन करताना सांगितले की केवळ चर्मकार मंडळाच्या फेऱ्या मारून समाजाला अपेक्षित लाभ मिळत नाही. समाज कल्याण विभागामध्ये संघटितपणे ताकद लावली तरच निधी आणि योजना प्रत्यक्षात मिळू शकतात. एकट्या व्यक्तीची कोणी दखल घेत नाही, मात्र संघटना मजबूत असेल तर समाजाचा आवाज प्रभावीपणे पोहोचतो, असे त्यांनी नमूद केले.
ज्ञानेश्वर वर्पे यांनीही बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अनेकांसाठी नवीन असून, त्या माहितीच्या आधारे समाजातील गरजू कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देता येऊ शकतो. यासाठी केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कामाला लागण्याची गरज असल्याचा त्यांनी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशांत कारंडे यांनी आभार प्रदर्शन करून बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाल्याची घोषणा केली. यावेळी फेब्रुवारी महिन्यात साजरी होणाऱ्या जयंतीनिमित्त संघटनेतर्फे छापण्यात आलेल्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. जयंतीसाठी वर्गणी गोळा करण्यासाठी सर्व सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य केले असून अनेकांनी पुस्तके आपल्या ताब्यात घेतली आहेत.
या बैठकीतून समाज संघटन अधिक मजबूत करणे, शिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढी सक्षम करणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा ठाम निर्धार व्यक्त झाला.
Comments
Post a Comment