तळदेव विभागात इंटरनेटचा खेळखंडोबा कायम; बीएसएनएलच्या दुर्लक्षामुळे नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटक त्रस्त

तळदेव विभागात इंटरनेटचा खेळखंडोबा कायम; बीएसएनएलच्या दुर्लक्षामुळे नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटक त्रस्त

तळदेव प्रतिनिधी — 

महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तळदेव विभागात इंटरनेट सेवेचा गंभीर प्रश्न अद्यापही कायम असून नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरात फक्त बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध असले तरी मोबाईलला सिग्नल असूनही इंटरनेट सेवा अत्यंत संथ किंवा पूर्णतः बंद असल्याची स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह येथे येणारे पर्यटकही प्रचंड त्रास सहन करत आहेत.

इंटरनेट सुविधा नसल्यामुळे तळदेव बाजारपेठेत यूपीआय व ऑनलाइन व्यवहार करणे जवळपास अशक्य झाले आहे. किरकोळ दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, वाहनचालक आणि इतर सेवा पुरवठादारांना रोख व्यवहारांवरच अवलंबून राहावे लागत असून अनेकदा ग्राहकांशी वादाची परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषतः पर्यटकांकडे रोख रक्कम उपलब्ध नसल्यास व्यवहार रखडत असून याचा थेट परिणाम स्थानिक व्यवसाय आणि पर्यटनावर होत आहे.

या समस्येचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. ऑनलाइन शिक्षण, असाइनमेंट, शैक्षणिक माहिती, परीक्षा अर्ज आणि विविध शासकीय शैक्षणिक प्रक्रिया इंटरनेटवर अवलंबून असताना तळदेव विभागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटसाठी इतर गावांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आरोग्य सेवा, बँकिंग व्यवहार, शासकीय अर्ज, ऑनलाइन सेवा तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी इंटरनेट अत्यावश्यक असतानाही या मूलभूत सुविधेकडे बीएसएनएल प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या संदर्भात वारंवार तक्रारी देऊनही अद्याप कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही.

दरम्यान, या समस्येबाबत तळदेव येथील बीएसएनएल टेक्निशियन दीपक जाधव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हा विषय त्यांनी वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. मात्र त्यांच्या कार्यक्षेत्रात इंटरनेट सेवा सुरळीत करण्याचा अधिकार नसून ते केवळ लाईट, सोलर व जनरेटरच्या मेंटेनन्सचे काम पाहतात. त्यामुळे या समस्येवर ते स्वतः काही करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इंटरनेटच्या सततच्या खेळखंडोब्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून संतापाची भावना दिवसेंदिवस वाढत आहे. लवकरात लवकर तळदेव विभागात सक्षम व सुरळीत इंटरनेट सेवा उपलब्ध न झाल्यास बीएसएनएल कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. दुर्गम असला तरी पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या तळदेव विभागात तातडीने मजबूत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl