महाबळेश्वरात शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का; डी. एम. बावळेकरांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
महाबळेश्वरात शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का; डी. एम. बावळेकरांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
सातारा प्रतिनिधी —
महाबळेश्वर तालुक्यातील राजकारणात आज महत्त्वाचा बदल घडताना दिसून आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. महाबळेश्वरचे शिवसेना उबाठा गटाचे नेते डी. एम. बावळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हा पक्षप्रवेश सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपचे माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, सुरभी भोसले, सुनील काटकर, चिन्मय कुलकर्णी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, साताऱ्याचे नवनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर विकास आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असून सातारा जिल्ह्यातही पक्षाचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजपमध्ये ‘इनकमिंग’ सुरू झाली असून डी. एम. बावळेकर यांचा प्रवेश हा त्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने सातारा जिल्ह्यात आपली संघटनात्मक मांड अधिक मजबूत केल्याचे चित्र आहे. महाबळेश्वर तालुक्यात उबाठा गटाला बसलेल्या या धक्क्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. या पक्षप्रवेशामुळे येत्या निवडणुकांचे राजकारण नव्या वळणावर जाण्याची चिन्हे आहेत.
यावेळी बोलताना डी. एम. बावळेकर यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने अनेक ठिकाणी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महाबळेश्वर शहर आणि तालुका विकासापासून वंचित राहिला असून ग्रामीण भागात अनेक मूलभूत अडचणी निर्माण झाल्या आहेत. आम्ही जर महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक ‘कमळ’ चिन्हावर लढवली असती तर निश्चितच विजय मिळवला असता. महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीत प्रथमच ‘कमळ’ फुलले असून येणाऱ्या काळात संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात ‘कमळ’ फुलविण्यासाठी ताकदीने काम करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे महाबळेश्वर तालुक्यात भाजपची ताकद अधिक वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Comments
Post a Comment