‘ऑरेंज द वर्ल्ड’ उपक्रमांतर्गत महाबळेश्वरात महिला सुरक्षा जनजागृती; गिरिस्थान प्रशालेत कायदे व स्वसंरक्षणाचे प्रभावी मार्गदर्शन
‘ऑरेंज द वर्ल्ड’ उपक्रमांतर्गत महाबळेश्वरात महिला सुरक्षा जनजागृती; गिरिस्थान प्रशालेत कायदे व स्वसंरक्षणाचे प्रभावी मार्गदर्शन
महाबळेश्वर प्रतिनिधी –
इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वर यांच्या वतीने ‘UNiTE’ व ‘ऑरेंज द वर्ल्ड – UN Women’ या जागतिक अभियानांना प्रतिसाद देत “महिला व मुलींवरील हिंसाचार थांबवा” या संदेशाखाली गिरिस्थान प्रशालेमध्ये महिला सुरक्षा आणि कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवण्याचा क्लबचा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमात अॅड. राधा मुक्कावार यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कायदेशीर अधिकारांची सोप्या आणि सविस्तर भाषेत माहिती दिली. महिलांवरील अत्याचार, लैंगिक गुन्हे, छळवणूक प्रतिबंध आणि तक्रार प्रक्रियेबाबत त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले. स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत श्री. संजय पार्टे यांनी विद्यार्थिनींना कराटेचे प्रभावी प्रशिक्षण देत दैनंदिन जीवनात वापरता येतील अशा तंत्रांचे प्रात्यक्षिक केले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लब अध्यक्षा सौ. वर्षा पार्टे, सेक्रेटरी सपना अरोरा, PDC रोहिणी वैद्य यांच्यासह क्लबच्या १३ सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन अभिषेक साळुंखे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल सौ. शाहीन पन्हाळकर यांनी केले.
या कार्यक्रमाला रोहिणी बगाडे, शोभा शिंदे, ऋजुता दीक्षित, जानवी शिंदे, ऐश्वर्या इंगवले, वैशाली जाधव मॅडम यांची मान्यवर उपस्थिती लाभली. गिरिस्थान प्रशालेचे प्राचार्य श्री. पी. आर. माने सर यांनी विद्यार्थिनींना सुरक्षितता, सजगता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराला प्रतिबंध करणे, कायदेशीर माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि स्वसंरक्षण कौशल्य विकसित करणे या तिन्ही मुद्द्यांना स्पर्श करणारा हा उपक्रम विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करणारा ठरला. इनर व्हील क्लबचा हा सकारात्मक उपक्रम समाजात महिला सुरक्षा विषयक भक्कम बदल घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.
Comments
Post a Comment