सम-विषम पार्किंग केवळ फलकापुरतेच; मारिपेठ रस्त्यावर वाहतूक कोंडीचा त्रास कायम
सम-विषम पार्किंग केवळ फलकापुरतेच; मारिपेठ रस्त्यावर वाहतूक कोंडीचा त्रास कायम
महाबळेश्वर प्रतिनिधी :
शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने महाबळेश्वरमधील मारिपेठ परिसरात सम-विषम तारखेनुसार पार्किंगचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची कोणतीही ठोस अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून गर्दीच्या काळात मारिपेठ रस्त्यावर वाहतूक कोंडी कायम आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
मारिपेठ हा महाबळेश्वर शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असून बाजारपेठ, दुकाने, हॉटेल्स आणि पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या वाहनांची येथे मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. या पार्श्वभूमीवर सम-विषम तारखेनुसार पार्किंगची योजना राबविण्यात आली होती. या योजनेमुळे रस्त्यावरील वाहने नियंत्रित राहतील आणि वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालक सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेधडकपणे वाहने उभी केली जात असल्याने अरुंद झालेल्या रस्त्यावर कोंडी वाढत असून काही वेळा वाहनांची लांबलचक रांग लागते. विशेषतः पर्यटन हंगामात आणि सुट्ट्यांच्या दिवशी ही समस्या अधिक तीव्र होत आहे. याचा थेट परिणाम पर्यटकांच्या वेळेवर आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर होत आहे.
स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी या संदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. केवळ फलक लावून जबाबदारी झटकू नये, तर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून प्रत्यक्षात सम-विषम पार्किंग व्यवस्था राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पर्यटन हंगाम सुरू असताना तरी मारिपेठसारख्या महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतूक नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सम-विषम पार्किंगची प्रभावी अंमलबजावणी, नियमित तपासणी आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केल्यासच शहरातील वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात तरी नियंत्रण मिळू शकते, अशी अपेक्षा महाबळेश्वरकर व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment