कर बुडवणाऱ्यांना राजकीय वरदहस्त, तर सामान्यांवर तात्काळ कारवाई; अशा उमेदवारांना जनता घरी बसवेल – कुमार शिंदे

कर बुडवणाऱ्यांना राजकीय वरदहस्त, तर सामान्यांवर तात्काळ कारवाई; अशा उमेदवारांना जनता घरी बसवेल – कुमार शिंदे

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर देवस्थान नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढत असताना नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सामान्य जनतेने कर थकवला तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते, मात्र डोक्यावर राजकीय वरदहस्त असलेल्या काही लोकांना कर बुडवूनही मोकळे रान दिले जाते आणि अशांनाच नगरपालिकेची उमेदवारी दिली जाते, हा उघड दुजाभाव महाबळेश्वरची जनता आता सहन करणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रचारादरम्यान बोलताना कुमार शिंदे म्हणाले की, नगरपालिकेचे उत्पन्न मर्यादित असून कर हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र काही विरोधी उमेदवारांनी प्रदूषण कर आणि जाहिरात कर बुडवून पालिकेच्या तिजोरीवर मोठा भार टाकला आहे. पालिकेचे आर्थिक कंबरडे मोडणारी हीच मंडळी आज विकासाच्या नावाने निवडणुकीत उतरली आहेत, हे जनतेला अजिबात पटणारे नाही. संबंधित उमेदवारांनी कर कशा पद्धतीने बुडवले याचे ठोस पुरावे आम्ही उच्च न्यायालयात सादर केले असून निवडणूक प्रक्रियेतील पुढील सुनावणीची तारीखही निश्चित झाली आहे. प्राथमिक टप्प्यातच आमचे पुरावे ग्राह्य धरले गेले असल्याने सत्य लवकरच जनतेसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सामान्य नागरिकांनी कर थकवला तर तात्काळ नोटिसा, जप्ती आणि कडक कारवाई करणारे अधिकारी काही विशिष्ट लोकांच्या बाबतीत मात्र गप्प का बसतात, असा सवाल उपस्थित करत कुमार शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणात सहभागी असलेल्या आणि निवडणूक प्रक्रियेला अप्रत्यक्ष पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. कायद्यापुढे सर्वजण समान असले पाहिजेत, हीच आमची ठाम भूमिका असून न्यायालय योग्य तो निर्णय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येत्या २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, कर बुडवणारे, नगरपालिकेचे आर्थिक नुकसान करणारे आणि राजकीय बळावर माजलेले उमेदवार महाबळेश्वरच्या विकासासाठी घातक आहेत. अशा उमेदवारांना जनता निश्चितपणे घरचा रस्ता दाखवेल आणि निष्पक्षपणे योग्य, प्रामाणिक आणि शहराच्या भविष्यासाठी काम करणारा उमेदवार निवडेल, असा विश्वास नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl