सातारा जिल्ह्यात ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ; किशोरवयीन मुलींच्या संरक्षणासाठी राज्याचे मोठे पाऊल
सातारा जिल्ह्यात ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ; किशोरवयीन मुलींच्या संरक्षणासाठी राज्याचे मोठे पाऊल
सातारा प्रतिनिधी –
महाराष्ट्र शासनाने महिला व किशोरवयीन मुलींसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या दिशेने महत्त्वाचे आणि परिवर्तन घडवणारे पाऊल टाकत ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ (Cervical Cancer Mukt Maharashtra) या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ केला असून सातारा जिल्हा हा हा उपक्रम सुरू करणाऱ्या पहिल्या जिल्ह्यांपैकी एक ठरला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे एचपीव्ही (HPV) लसीकरण, नियमित तपासणी आणि लवकर निदान यांच्या माध्यमातून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला पूर्णपणे प्रतिबंध घालणे आणि तरुण मुलींच्या आरोग्याचे रक्षण करणे.
भारतामध्ये वाढता धोका, प्रतिबंध गरजेचा
भारतामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मृत्यू करणारा आजार असून दर आठ मिनिटांनी एका महिलेला प्राण गमवावा लागत असल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. दररोज सुमारे २०० महिलांचा जीव घेणाऱ्या या आजारापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लस अत्यंत प्रभावी आहे, तसेच लवकर तपासणीने हा कर्करोग पूर्णपणे टाळता येतो. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
सातारा जिल्ह्यात मोहीमेची दमदार सुरुवात
सातारा जिल्ह्यात या अभियानांतर्गत ८,००० हून अधिक किशोरवयीन मुलींना आजवर लसीकरणाद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून शाळांमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून पालक आणि विद्यार्थ्यांसाठी जागरूकता सत्रांचे आयोजनही सुरू आहे. यामुळे एचपीव्ही लसीबद्दल जनमानसात सकारात्मकता आणि स्वीकारार्हता वाढत आहे.
राज्याचा भागीदार : जीविका फाउंडेशन
या अभियानाच्या अंमलबजावणीत ‘जीविका फाउंडेशन (जीविका हेल्थकेअर)’ राज्याचा अधिकृत भागीदार म्हणून काम करत आहे. मोठ्या प्रमाणावर समुदाय जागरूकता निर्माण करणे, शाळा-स्तरावरील अंमलबजावणी, पालकांचे मार्गदर्शन, तसेच क्षेत्रीय टीमद्वारे लसीकरण समन्वय हे महत्त्वाचे कार्य जीविका फाउंडेशन हाती घेत आहे.
कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत अनेक उद्योगांनी या सामाजिक आरोग्य उपक्रमासाठी सहकार्याचे हात पुढे केले आहेत. साताऱ्यात आतापर्यंत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई, क्रेडिटॲक्सेस ग्रामीण लिमिटेड, कॅरॅटलैन आणि ब्रिजनेक्स्ट इंडिया प्रा. लि. यांच्या CSR सहाय्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण शक्य झाले आहे.
मुलींचे संरक्षण ही सामाजिक जबाबदारी – मुख्यमंत्री फडणवीस
या अभियानाच्या शुभारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
“किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानाद्वारे आपण प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा लोकांच्या दारी पोहोचवत आहोत. कॉर्पोरेट क्षेत्राने CSR अंतर्गत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे आणि या कर्करोगाविरुद्धच्या लढ्याला बळ द्यावे,” असे त्यांनी आवाहन केले.
आरोग्यदायी भविष्यासाठी राज्याची भक्कम पावले
या अभियानामुळे ग्रामीण व शहरी भागातील लाखो किशोरवयीन मुलींच्या आरोग्याचे संरक्षण होणार असून महाराष्ट्रातील महिलांसाठी एक व्यापक, दूरदृष्टीचा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम उभा राहत आहे. साताऱ्यातील यशस्वी सुरुवात संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरत असून या उपक्रमामुळे महाराष्ट्र ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त’ बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे.
Comments
Post a Comment