महाबळेश्वर टॅक्सी संघटनेकडून श्री दत्त मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा: हिंदू–मुस्लीम ऐक्याची नवी नांदी


महाबळेश्वर टॅक्सी संघटनेकडून श्री दत्त मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा: हिंदू–मुस्लीम ऐक्याची नवी नांदी

✍️राजेश सोंडकर,

महाबळेश्वर प्रतिनिधी – 

महाबळेश्वर शहरातील धार्मिक सौहार्द आणि हिंदू–मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेने नव्या रूपात उभारलेल्या श्री दत्त मंदिराचा तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण आणि भव्य उद्घाटन सोहळा यंदा उत्साहात पार पडणार आहे. नगरातील सर्वधर्मीय वाहनचालकांनी एकत्र येत मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केल्याने एकतेचा आदर्श महाबळेश्वरमध्ये उमटला आहे.

शके १९४७ मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत, म्हणजे २ डिसेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा भक्तिमय सोहळा साजरा होणार असून, तीन दिवस धार्मिक विधी, भजनी कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.

मान्यवरांची भव्य उपस्थिती

या सोहळ्यास महाराष्ट्रातील अनेक राजकीय, धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक म्हणून मा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (खासदार, सातारा लोकसभा) आणि मा. नामदार मकरंद (आबा) पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई, आमदार श्री. शशिकांत शिंदे, खासदार नितीन (काका) पाटील व इतर पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.

तसेच महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेशजी पाटील, वारकरी सांप्रदाय मंडळ, देणगीदार, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि महाबळेश्वर तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


तीन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

पहिला दिवस – २ डिसेंबर २०२५ (मंगळवार)

पहिल्या दिवशी सायंकाळी मंदिरातील श्रींच्या पादुकांना महाअभिषेक करण्यात येईल. त्यानंतर श्री दत्त व श्री महालक्ष्मी मूर्तींना ‘धान्यवास’ विधीने धान्यात ठेवण्याचा पारंपरिक विधी पार पडणार आहे.


दुसरा दिवस – ३ डिसेंबर २०२५ (बुधवार): प्राणप्रतिष्ठापना व भक्तीचा जागर

दुसऱ्या दिवशी पहाटेपासून महत्त्वाच्या धार्मिक विधींना सुरुवात होईल. मंगलचरण, संकल्प, पुण्याहवाचन, नवग्रह–पीठ देवता स्थापना, जलाधिवास, रूद्राभिषेक, सप्तस्नान, हवन, बलिदान आणि पूर्णाहूती असे सर्व विधी वेदशास्त्रानुसार पार पाडले जातील.
सकाळी ११.४५ वाजता श्री दत्त व लक्ष्मीमातेची प्राणप्रतिष्ठापना वेदाचार्य श्री खरे काका (वाई) यांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी १२.४५ वाजता परमपूज्य श्री अभयानंद स्वामीजी (काडसिद्धेश्वर आश्रम, मश्वर) यांच्या हस्ते कलशारोहण होईल.

दुपारी १ वाजल्यापासून जननीमाता प्रासादिक भजन मंडळ (बोंडारवाडी), स्वर साधना मंडळ (मशवर), गोपाळ कृष्ण भजन मंडळ (मेटगुताड) या भजनी मंडळांच्या सुस्वर कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरण रंगणार आहे.


तिसरा दिवस – ४ डिसेंबर २०२५ (गुरुवार): भव्य उद्घाटन व महाप्रसाद

तिसऱ्या दिवशी पहाटे श्रींच्या मूर्तीला महाअभिषेक होणार असून सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री सत्यदत्त महापूजा आयोजित केली आहे.
दुपारी १२ वाजता श्री दत्त जन्म सोहळा, सुंठवडा आणि तिर्थप्रसाद वाटप होईल.
दुपारी १ वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडेल. त्यानंतर दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था असेल.

या दिवशी महिला तसेच विविध भजनी मंडळांचे भजनी कार्यक्रम सुरू राहणार असून रात्री १० वाजेपर्यंत भक्तिगीतांच्या गजरात परिसर दुमदुमून जाईल.


महाबळेश्वर टॅक्सी संघटनेच्या वतीने सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंगल सोहळ्याचा लाभ घ्यावा, दर्शन–महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि धार्मिक–सामाजिक एकतेचा संदेश पुढे न्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl