महाबळेश्वर अर्बन बँकेची ९० वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; निर्बंध हटताच कर्ज सुविधा पुन्हा सुरू

महाबळेश्वर अर्बन बँकेची ९० वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; निर्बंध हटताच कर्ज सुविधा पुन्हा सुरू

जितेंद्र कारंडे,

प्रतापगड प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., महाबळेश्वर यांची ९० वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आराम हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाबळेश्वर येथे बँकेचे अध्यक्ष मा. श्री. समीर मुबारक सुतार यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

अध्यक्षीय मनोगतात मा. चेअरमन श्री. समीर सुतार यांनी पर्यटन व्यवसायातील मरगळ, बाजारपेठेतील उदासीनता तसेच रिझर्व्ह बँक व सहकार खात्याच्या जाचक नियमांच्या पार्श्वभूमीवरही बँकेने अहवाल सालात उल्लेखनीय कामगिरी करत ५२ कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याची माहिती दिली. सेव्हिंग्ज ठेव व पिग्मी ठेव खात्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून अहवाल सालात ४ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी वसुली करण्यात आली आहे, तर चालू वर्षात आतापर्यंत १ कोटी १७ लाख रुपयांची वसुली झाली आहे. उर्वरित थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई सुरू असून जप्ती व लिलावाद्वारे वसुली केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभासदांनी वसुलीसाठी बँकेस सहकार्य करावे, भागभांडवलात ५० लाखांची वाढ करण्यात आली असून पुढील भागभांडवल वाढीसाठीही सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार आपल्या बँकेमार्फत करावेत तसेच कर्जदारांनी वेळेत परतफेड करून कायदेशीर कारवाईची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्कनुसार बँकेवर लादण्यात आलेले सर्व निर्बंध मागे घेण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती चेअरमन श्री. समीरभाई सुतार यांनी दिली. आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेरची रिझर्व्ह बँकेची तपासणी व वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झाले असून मागील चार वर्षांपासून लागू असलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे चार वर्षांपासून बंद असलेली कर्ज सुविधा सभासदांसाठी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून नियमित व वेळेत परतफेड करणाऱ्या सभासदांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांहून अधिक काळ सर्वांच्या सहकार्याने बँकेचा कारभार पारदर्शक व सर्वसमावेशक पद्धतीने सुरू असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बँकेकडून आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस या आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून एटीएम सुविधेला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात कॅश डिपॉझिट मशीन, बँकेचे मोबाईल अॅप, ज्येष्ठ सभासदांसाठी विरंगुळा केंद्र तसेच महिला सभासदांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

सभासद समूह अपघात विमा योजनेअंतर्गत दिवंगत सभासद पै. मेहेरबानु खारकडे यांच्या कुटुंबीयांना ३ लाख रुपयांचा धनादेश चेअरमन व संचालक मंडळाच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

सभेचे सूत्रसंचालन, इतिवृत्त वाचन व ऑडिट रिपोर्टचे वाचन मुख्य व्यवस्थापक श्री. फकीरभाई वलगे यांनी केले. सुरुवातीस संचालक श्री. चंद्रकांत बाळवेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली संचालक श्री. प्रशांत कात्रट यांनी अर्पण केली, तर अहवाल वाचन संचालक श्री. सतीश ओंबळे यांनी केले. उपस्थित सभासदांच्या वतीने विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले असून त्यांचे समाधानकारक उत्तर चेअरमन श्री. समीरभाई सुतार यांच्यासह संचालक मंडळ व मुख्य व्यवस्थापकांनी दिले. आभार प्रदर्शन संचालक श्री. जावेद वलगे यांनी केले आणि राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

यावेळी विद्यमान संचालक मंडळ, बँकेचे वकील, नगरसेवक, माजी नगरसेवक, पत्रकार, आजी-माजी चेअरमन, तज्ञ संचालक तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. बँकेच्या स्थैर्यपूर्ण वाटचालीला मिळालेल्या नव्या बळामुळे महाबळेश्वर अर्बन बँक पुन्हा एकदा तालुक्याच्या आर्थिक विकासात सक्रिय भूमिका बजावणार असल्याचा विश्वास सभासदांमध्ये व्यक्त होताना दिसून आला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl