कॅनॉट पीकजवळ ४० वर्षीय गणेश शिंदे यांचा गळफास घेऊन मृत्यू; महाबळेश्वरमध्ये खळबळ
कॅनॉट पीकजवळ ४० वर्षीय गणेश शिंदे यांचा गळफास घेऊन मृत्यू; महाबळेश्वरमध्ये खळबळ
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर शहरातील प्रसिद्ध कॅनॉट पीक पॉईंट परिसरातील दाट जंगलात एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. गणेश शंकर शिंदे (वय ४०, रा. साई निवास, कोळी आळी, महाबळेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे महाबळेश्वर आणि कोळी आळी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे शुक्रवारी रात्री एका लग्न समारंभातून घरी आल्यावर सुमारे १० वाजता “बाहेर जाऊन येतो” असे सांगून घरातून बाहेर पडले. पहाटेपर्यंत ते परतले नसल्याने कुटुंबीयांनी शहरासह परिसरात शोध घेतला; मात्र त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. सकाळपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेच्या दरम्यान दुपारी सुमारे १२ वाजता राजू शिंदे यांचा मुलगा संकेत याला गणेश यांनी कॅनॉट पीक परिसरात गळफास घेतल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.
राजू शिंदे, सुनील भाटीया, सुनील ढेबे आणि सचिन ढेबे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता गणेश शिंदे हे जांभळीच्या झाडाला लाल नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळले. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पुढे महाबळेश्वर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
घटनेची माहिती मृताच्या चुलत भावाने राजू शिंदे (वय ४९, रा. रॉकडेल बंगला, महाबळेश्वर) यांनी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल मर्ढेकर तपास करत आहेत.
गणेश शिंदे हे महाबळेश्वरमधील एक उत्साही व उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात होते. त्यांचा मोठा मित्रपरिवार असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई आणि भाऊ असा आप्तपरिवार आहे. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Comments
Post a Comment