सह्याद्रीत रानगव्याचा हल्ला; गस्तीदरम्यान वनमजूर गंभीर जखमी, कराड येथे उपचार सुरू

सह्याद्रीत रानगव्याचा हल्ला; गस्तीदरम्यान वनमजूर गंभीर जखमी, कराड येथे उपचार सुरू 

✍️सूर्यकांत पवार

कासप्रतिनिधी  दि. २१ — 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मालदेव नियतक्षेत्रात रानगव्याने केलेल्या हल्ल्यात वनमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सुभाष तुकाराम गुरव (वय ४५) असे जखमी झालेल्या वनमजुराचे नाव आहे. वनक्षेत्रात गस्त घालत असताना अचानक समोर आलेल्या रानगव्याने गुरव यांच्यावर हल्ला केला. ही घटना शनिवार (दि. २०) रोजी दुपारी घडली.

या हल्ल्यात गुरव यांच्या हाताला, पायाला व छातीला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी साताऱ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण व उपसंचालक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे, वनपाल संदीप पवार, प्रवीण मोरे, वनरक्षक गणेश भोऱ्हडे, आनंद मरागजे यांनी परिस्थिती हाताळत जखमी कर्मचाऱ्याला तातडीची मदत पोहोचवली. वनविभागाकडून वन्यप्राण्यांच्या अधिवासात काम करताना वावरताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.

 शासकीय मदतीची गरज
वनविभागाचे कर्मचारी जंगलाचे रक्षण करताना अनेकदा आपला जीव धोक्यात घालतात. कालच्या घटनेतून याची ठळक प्रचिती आली. रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुभाष गुरव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे शासनाने त्यांना तातडीने व जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.

 सहकाऱ्यांचे धाडस

मालदेव नियतक्षेत्रातील ही घटना अत्यंत थरारक व अंगावर शहारे आणणारी होती. रक्तस्राव होत असलेल्या गुरव यांना पहिल्या काही तासांत उपचार मिळणे अत्यावश्यक होते. कोणतीही आधुनिक साधनसामग्री उपलब्ध नसताना केवळ जिद्द आणि धैर्याच्या जोरावर वनरक्षक गणेश भोऱ्हडे व आनंद मरागजे यांनी आपल्या सहकाऱ्याला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl