इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये डीजेवर गुन्हा ठरू शकतो; महाबळेश्वरमध्ये नववर्ष जल्लोषावर कायदेशीर कारवाई होणार का?
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये डीजेवर गुन्हा ठरू शकतो; महाबळेश्वरमध्ये नववर्ष जल्लोषावर कायदेशीर कारवाई होणार का?
महाबळेश्वर प्रतिनिधी :
हिंदू सण-उत्सवांच्या काळात ध्वनीप्रदूषणाबाबत कठोर भूमिका घेणारे पोलीस व प्रशासन नववर्ष स्वागताच्या नावाखाली सुरू असलेल्या डीजे, लाईव्ह म्युझिक आणि कर्णकर्कश साऊंड सिस्टिमकडे दुर्लक्ष करणार का, असा थेट सवाल महाबळेश्वरमध्ये उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे महाबळेश्वर हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने येथे ध्वनीप्रदूषणासंदर्भात अत्यंत कडक नियम लागू असून त्यांचे उल्लंघन दखलपात्र गुन्हा ठरू शकते.
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ठराविक वेळेची मर्यादा ओलांडली किंवा परवानगीविना साऊंड सिस्टिम वापरली तर तात्काळ कारवाई केली जाते. मात्र ३१ डिसेंबरच्या रात्री शहरातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर डीजे, मोठ्या आवाजातील संगीत आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे कार्यक्रम सुरू असतात. या गोंगाटावर अनेकदा कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून प्रशासनाची भूमिका दुजाभावाची असल्याची भावना निर्माण झाली आहे.
पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० तसेच भारतीय न्याय संहितेनुसार इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणे, परवानगीशिवाय डीजे वाजवणे किंवा नियमांचे उल्लंघन करणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. परवानगी दिली असली तरी ESZ क्षेत्रात आवाजावर कडक बंधने लागूच राहतात, हे कायद्यात स्पष्ट नमूद आहे.
या प्रकरणी पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे पूर्ण अधिकार असून गरज भासल्यास साऊंड सिस्टिम जप्त करणे, कार्यक्रम तात्काळ बंद पाडणे आणि आयोजकांवर फौजदारी कारवाई करणे शक्य आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तहसील प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही स्वतंत्रपणे कारवाई करण्याचे अधिकार आहेत. नागरिकांच्या थेट तक्रारीवरूनही पोलीस दखल घेऊन गुन्हा दाखल करू शकतात.
नववर्षाच्या रात्री होणाऱ्या प्रचंड गोंगाटामुळे शहरातील रहिवासी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व विद्यार्थी यांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. याचा परिणाम केवळ मानवी आरोग्यावरच नाही, तर महाबळेश्वरच्या जंगलातील वन्यजीवांवरही होत असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात. “इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये डीजे हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून तो थेट पर्यावरण संरक्षणाशी संबंधित गंभीर प्रश्न आहे,” अशी ठाम भूमिका पर्यावरण कार्यकर्त्यांनी मांडली आहे.
हिंदू सणांच्या वेळी नियम काटेकोरपणे राबवले जात असतील, तर नववर्ष स्वागताच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनीप्रदूषणालाही तेच नियम लागू होणार का, की कायदे केवळ काही निवडकांसाठीच आहेत, असा रोखठोक सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. त्यामुळे महाबळेश्वरसारख्या इको सेन्सिटिव्ह शहरात पोलीस व प्रशासन नववर्षाच्या जल्लोषावर नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment