महाबळेश्वर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा भगवा फडकला, सुनील शिंदेंचा दणदणीत विजय; जल्लोषात शहर दुमदुमले
महाबळेश्वर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा भगवा फडकला, सुनील शिंदेंचा दणदणीत विजय; जल्लोषात शहर दुमदुमले
महाबळेश्वर, प्रतिनिधी —
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत नगरपालिकेवर आपला झेंडा रोवला आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील लक्ष्मण शिंदे यांनी भरघोस मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला असून मतदारांनी स्पष्टपणे राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. या निकालामुळे महाबळेश्वरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडून आला आहे.
नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. एकूण नगरसेवक पदांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल १३ उमेदवार विजयी झाले असून नगरपरिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आली आहे. विविध प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी चुरशीच्या आणि काही ठिकाणी अटीतटीच्या लढतीत बाजी मारत मतदारांचा विश्वास संपादन केला.
या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानेही आपली उपस्थिती दाखवत पाच नगरसेवक निवडून आणले आहेत. भाजपला अपेक्षेइतके यश मिळाले नसले तरी पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. विशेष म्हणजे एक अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा बंडखोर म्हणून निवडून आल्याने आगामी राजकीय गणितांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दि. २० डिसेंबर २०२५ रोजी शांततेत मतदान पार पडले होते, तर दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष सुरू केला. फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला. “किंगमेकर नासिर मुलाणी” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला असून राष्ट्रवादी समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
ही निवडणूक मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेल्या रणनीतीला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. या विजयात राजू शेठ राजपुरे, संजय गायकवाड यांची भक्कम साथ आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे परिश्रम महत्त्वाचे ठरले असल्याचे बोलले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने मतदान करत राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला.
नव्या नगराध्यक्षांसह निवडून आलेले नगरसेवक शहराचा सर्वांगीण विकास, पर्यटनाला चालना, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि स्थानिक प्रश्नांवर प्रभावी काम करतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. एकूणच या निकालामुळे महाबळेश्वरच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान अधिक भक्कम झाले असून आगामी काळात नगरपालिकेच्या निर्णय प्रक्रियेत राष्ट्रवादीचा ठसा ठळकपणे उमटणार, हे निश्चित झाले आहे.
Comments
Post a Comment