“६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातील सर्व आंबेडकर पुतळ्यांच्या स्वच्छता-सजावटीचे आदेश; सामाजिक न्याय विभागाचे नगर व ग्रामविकास विभागांना निर्देश”
“६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातील सर्व आंबेडकर पुतळ्यांच्या स्वच्छता-सजावटीचे आदेश; सामाजिक न्याय विभागाचे नगर व ग्रामविकास विभागांना निर्देश”
मुंबई प्रतिनिधी :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातील सर्व पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी व फुलांची सजावट करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने संबंधित विभागांना आदेश जारी केले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने १४ नोव्हेंबर २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे नगर विकास विभाग आणि ग्राम विकास विभागास तातडीच्या कार्यवाहीची सूचना देण्यात आली आहे.
कामगार नेते रमेश मारुती जाधव यांनी १० नोव्हेंबर रोजी केलेल्या निवेदनाच्या आधारावर ही कार्यवाही झाली. त्यांच्या निवेदनात संपूर्ण महाराष्ट्रात ६ डिसेंबरपूर्वी सर्व आंबेडकर पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता आणि सजावट करण्याची मागणी करण्यात आली होती. हे निवेदन सामाजिक न्याय विभागाने लक्षात घेऊन संबधित विभागांना पुढील प्रक्रिया करण्यास सांगितले आहे.
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या अनुक्रमे नगर विकास व ग्रामविकास विभागांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे आंबेडकर पुतळ्यांभोवतीची स्वच्छता, रंगरंगोटी, फुलांची सजावट व हारांची व्यवस्था यासाठी आवश्यक आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित करावेत, असे कक्ष अधिकारी अक्षय भोरके यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी आंबेडकरी स्मारकांवर व पुतळ्यांवर अभिवादन करतात. त्यामुळे या स्थळांची स्वच्छ व देखणी तयारी ही अत्यावश्यक बाब ठरते. शासनाच्या या निर्देशामुळे येत्या काही दिवसांत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वच्छता मोहीम व डागडुजीची कामे गतीने सुरू होणार आहेत.
या आदेशाची प्रत आयुक्त, समाज कल्याण, पुणे तसेच कार्यासन बांधकामे यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे. राज्यभरातील प्रशासन आता महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसाठी सज्ज होत असल्याचे चित्र दिसत आहे.
Comments
Post a Comment