सहकार मंत्र्यांची सातारा जिल्हा बँकेला भेट; पारदर्शक कारभार आणि डिजिटल प्रगतीला मंत्र्यांकडून दाद
सहकार मंत्र्यांची सातारा जिल्हा बँकेला भेट; पारदर्शक कारभार आणि डिजिटल प्रगतीला मंत्र्यांकडून दाद
सातारा प्रतिनिधी :
राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी आज सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सदिच्छा भेट देत बँकेच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेतला. बँकेचे विविध उपक्रम, कृषी विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी कर्जव्यवस्था आणि नागरिकसेवेतील नवे उपक्रम याबाबत मंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान बँकेचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.
शेतकरी, लघुउद्योजक आणि सर्वसामान्यांना स्थिर आर्थिक पाठबळ देण्यासाठी बँकेने उभारलेली विश्वासार्ह आणि पारदर्शक व्यवस्था उल्लेखनीय असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून अर्थपुरवठा अधिक सुलभ करण्यासाठी बँक सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्हा बँक जोमाने कार्यरत असून तिच्या कारभारामुळे सातारा जिल्ह्याचा सहकार क्षेत्रातील लौकिक अधिक दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे स्वागत केले. शिक्षक आमदार विक्रम काळे, बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळाचे सदस्य या भेटीदरम्यान उपस्थित होते. मंत्र्यांच्या भेटीमुळे जिल्हा बँकेच्या पुढील कार्ययोजनांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास सहकार क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment