मुख्य रस्ता की मृत्यूचा सापळा? पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याच्या दुरवस्थेवर नागरिक संतप्त; ठेकेदार-अधिकाऱ्यांना जाहीर जाब, आंदोलनाचा थेट इशारा

मुख्य रस्ता की मृत्यूचा सापळा? पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याच्या दुरवस्थेवर नागरिक संतप्त; ठेकेदार-अधिकाऱ्यांना जाहीर जाब, आंदोलनाचा थेट इशारा

भिलार प्रतिनिधी , ता. २६ —

 पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या पाचगणी–महाबळेश्वर मुख्य रस्त्याची अवस्था आज अक्षरशः विदारक झाली असून प्रशासकीय नियोजनाचा बोजवारा आणि रस्ता विकासकामातील प्रचंड दिरंगाई यामुळे नागरिकांचा संयम सुटण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांमधील वाढता असंतोष उफाळून आल्याने पाचगणी येथील रोटरी क्लबमध्ये नुकतीच पार पडलेली बैठक ही संतापाचा उद्रेक ठरली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरत थेट जाब विचारला.

या बैठकीला इंजिनिअर सी. डी. कृष्णा, मोहन हाडे तसेच संबंधित ठेकेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून ठिकठिकाणी रस्ता खोदून तसेच सोडण्यात आल्याने हा मार्ग प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. “हा मुख्य रस्ता आहे की मृत्यूचा सापळा?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. रस्त्यावर पसरलेली खडी, खोल खड्डे आणि सर्वत्र उडणारी धूळ यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे निदर्शनास आणण्यात आले.

अनेक ठिकाणी कोणतेही सुरक्षा फलक किंवा बॅरिकेड्स नसल्याने रात्रीचा प्रवास जीवावर बेतणारा ठरत आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे संपूर्ण परिसरात धुळीचे लोट उसळत असून त्याचा थेट फटका स्थानिक रहिवाशांना, विशेषतः लहान मुलांना बसत आहे. श्वसनाचे आजार वाढत असल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप आहे.

सर्वात गंभीर परिस्थिती रुग्णवाहिकांची असल्याचे चित्र समोर आले. तातडीच्या उपचारासाठी निघालेल्या रुग्णांना या रस्त्यावरील खोदकाम आणि कोंडीमुळे वेळेत रुग्णालयात पोहोचणे अवघड होत आहे. “या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेला, तर जबाबदारी कोणाची?” असा थेट आणि रोखठोक सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या बेफिकिरीवर बोट ठेवण्यात आले.

बैठकीत विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या पाचगणीच्या नासधुशीवरही जोरदार टीका झाली. महाबळेश्वर परिसरातील अनेक जुन्या वृक्षांची कत्तल होत असल्याचा मुद्दा पर्यावरणप्रेमींनी ठामपणे मांडला. पाचगणीची ओळख तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि दाट झाडीमुळे आहे, मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली झाडांची कत्तल सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. झाडे तोडण्याऐवजी पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता का बांधला जात नाही, असा सवाल करत निसर्गाचा ऱ्हास आता कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका बैठकीत घेण्यात आली.

जर येत्या काही दिवसांत कामात ठोस सुधारणा झाली नाही आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला नाही, तर संपूर्ण पाचगणीकर रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडतील, असा निर्वाणीचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी दिला. या बैठकीला पाचगणी आणि परिसरातील व्यापारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, रस्त्याच्या या दुरवस्थेचा थेट फटका पर्यटनावर बसू लागला आहे. पर्यटन हंगाम सुरू असतानाही पर्यटक हळूहळू या भागाकडे पाठ फिरवत असल्याचे व्यापारी संघटनांनी स्पष्ट केले. पाचगणी आणि महाबळेश्वरची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असताना रस्त्यांच्या या अवस्थेमुळे पर्यटकांनी या भागाकडे पाठ फिरवली, तर हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक आणि छोट्या दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान अटळ ठरेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने जागे होऊन पर्यटकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करत कामाला तातडीने वेग द्यावा, अशी ठाम आणि आक्रमक मागणी या बैठकीत करण्यात आली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl