मेढ्यात भाजपाचा अपेक्षित विजय; नगराध्यक्षपदासाठी अखेरपर्यंत चुरस, शिवसेनेचा कडवा प्रतिकार
मेढ्यात भाजपाचा अपेक्षित विजय; नगराध्यक्षपदासाठी अखेरपर्यंत चुरस, शिवसेनेचा कडवा प्रतिकार
✍️सूर्यकांत पवार
कास प्रतिनिधी –
जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाने नगराध्यक्षपदासह ११ जागा जिंकत वर्चस्व राखले. मात्र नगराध्यक्षपदासाठी अखेरपर्यंत झुंज द्यावी लागल्याने भाजपाच्या विजयाला चुरशीची किनार मिळाली. अवघ्या ४६ मतांनी निसटता विजय मिळाल्यानंतर नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकत गुलालाची उधळण केली.
या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांच्यात थेट दुरंगी लढत झाली. शिवसेनेने आक्रमकपणे प्रचार करत भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रूपाली वारागडे यांना १६१६ मते, तर शिवसेनेच्या रेश्मा करंजेकर यांना १५७० मते मिळाली. अवघ्या ४६ मतांनी वारागडे विजयी झाल्या. एकूण निकालात भाजपाला ११, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १ जागेवर समाधान मानावे लागले.
भाजपाच्या प्रचारात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह स्थानिक पातळीवरील नेत्यांचे भक्कम संघटन दिसून आले. दुसरीकडे शिवसेनेने नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुशबाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार करत भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही शेवटच्या टप्प्यात पदयात्रा व गाठीभेटी घेत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या निवडणुकीत खरी लढत भाजप व शिवसेना यांच्यातच रंगली. शिवसेनेतर्फे पालकमंत्री शंभूराज देसाई, अंकुश कदम व एकनाथ ओंबळे यांनी विशेष लक्ष घातले. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले होते. भाजपाने दोन जागा अगोदरच बिनविरोध निवडून आणत १८-० असा एकतर्फी विजय मिळवण्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात शिवसेनेने पाच जागा जिंकत नगराध्यक्षपदासाठी चिवट प्रतिकार केल्याने भाजपाचा उत्साह काहीसा मावळलेला दिसून आला.
राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाल्याने शहरात एकेकाळी सत्ता गाजवणाऱ्या पक्षाला आपले अस्तित्व राखता आले आहे. निवडणूक झालेल्या पंधरा जागांपैकी प्रभाग क्रमांक २, ३, ६, ७, ८, ९, १२, १३, १४ व १५ येथे अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या असून अनेक उमेदवार अवघ्या तीन ते पंधरा मतांच्या फरकाने विजयी झाले. प्रभाग क्रमांक ४ व ५ बिनविरोध झाले. प्रभाग १, १०, ११ व १७ येथे भाजपाने मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर प्रभाग १६ मध्ये शिवसेनेच्या शर्वरी गायकवाड यांनी एकतर्फी विजय मिळवला.
मेढ्यात एकही अपक्ष उमेदवार विजयी झाला नसला तरी प्रभाग क्रमांक ९, १२ व १४ मध्ये अपक्षांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेत प्रस्थापित पक्षांना विचार करायला लावले. आर्थिक पाठबळ अधिक मजबूत असते तर अपक्षही निवडून येऊ शकले असते, अशी चर्चा शहरात होती.
जावळीच्या राजकारणात अंकुश कदम यांची दमदार एन्ट्री
शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख अंकुश कदम यांनी ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढवण्याचा प्रयत्न केला. प्रचारादरम्यान ‘१८-० होऊ देणार नाही, सेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही तर तालुक्याच्या राजकारणातून बाहेर पडेन’ अशी ठाम घोषणा त्यांनी केली होती. कमी कालावधीत सूक्ष्म नियोजन करत शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून आणण्यात यश आल्याने अंकुश कदम यांची मेढा नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जावळीच्या राजकारणात दमदार एन्ट्री झाली आहे.
Comments
Post a Comment