रानकडसरीचा तरुण आर्किटेक्ट अनीश शिंदे यांचा ग्रामीण पाणीटंचाईवरील सखोल अभ्यास— आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता

रानकडसरीचा तरुण आर्किटेक्ट अनीश शिंदे यांचा ग्रामीण पाणीटंचाईवरील सखोल अभ्यास
— आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता

पोलादपूर प्रतिनिधी –

पोलादपूर तालुक्यातील रानकडसरी (बावली) या छोट्याशा खेड्यातून घडलेला तरुण आर्किटेक्ट अनीश शिंदे यांचे ग्रामीण पाणीटंचाईवरील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे. मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या अनीश यांनी पोलादपूर तालुक्यातील सखोल भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक निरीक्षणांवर आधारित ग्रामीण जलसंकटाचे वास्तव उलगडले आहे.

ग्रामीण भागातील पाणीटंचाईमुळे केवळ दैनंदिन जीवन विस्कळीत होत नाही, तर गावातील पारंपरिक सामाजिक नातेसंबंध, सहकार्याची संस्कृती आणि सामुदायिक एकता हळूहळू कमकुवत होत जाते, असा निष्कर्ष त्यांच्या अभ्यासातून पुढे आला. पाणीटंचाई हे केवळ नैसर्गिक कारणांमुळे नव्हे, तर अकार्यक्षम जलव्यवस्थापन, बंधाऱ्यांची कमतरता आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीतल्या त्रुटीमुळे ती अधिक गंभीर होते, असे त्यांनी संशोधनात स्पष्ट केले.

हा अभ्यास व त्यावर आधारित थीसिस ‘अर्बन डिझाईन लॅब’ या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर सादर करण्यात आला असून, तज्ज्ञांनी त्यांच्या संकल्पना, विश्लेषण आणि उपाययोजनांचे विशेष कौतुक केले आहे. आदित्य कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी असलेल्या अनीश यांना प्रा. रीटा नायक आणि सलमान चौहान यांचे मार्गदर्शन तसेच पत्रकार प्रकाश कदम व विजय कळंबे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

अनीश शिंदे यांनी हा संपूर्ण प्रस्ताव राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासमोर सादर केला असून, ग्रामीण जलव्यवस्थापन सुधारण्यासाठी त्यांच्या शोधनिबंधातील उपाययोजना प्रत्यक्षात राबविण्याबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे.

अभ्यासातील प्रमुख उपाययोजना :

• सुधारित जलव्यवस्थापनामुळे कृषी उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
• रोजगारनिर्मितीला चालना मिळाल्यास तरुणांचे शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होऊ शकते.
• सावित्री, ढवळी, कामथी, घोडवणी, चोळई व जगबुडी नदीवर मोठे बंधारे किंवा धरणांची तातडीची गरज.
• कृषी विभाग व रोजगार हमी योजनेंतर्गत पाणी अडविण्याच्या प्रकल्पांना गती देणे अत्यावश्यक.
• ‘गोळेगणी पॅटर्न’ जलकुंड प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
• पोलादपूर तालुक्याला ‘मॉडेल प्रकल्प’ म्हणून विकसित केल्यास कृषीपर्यटनाद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती शक्य.

पत्रकार प्रकाश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या संशोधनातून ग्रामीण पाणीटंचाईच्या समस्यांचे मूळ स्वरूप आणि त्यावरील व्यावहारिक उपाय अचूकपणे मांडले गेले आहेत.

अनीश शिंदे यांचे हे कार्य केवळ पोलादपूर तालुक्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकण आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी दिशा देणारे ठरू शकते. ग्रामीण प्रश्नांवर वास्तवाधारित संशोधन करून ठोस उपाय मांडणारा हा तरुण संशोधक नव्या पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl