महाबळेश्वरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला वेग; बाजारपेठेतून भव्य रॅली, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाबळेश्वर, दि. १५ (प्रतिनिधी) :
पालिका निवडणूक जवळ आल्याने महाबळेश्वर शहरात प्रचाराला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार रॅलीने आज शहरातील मुख्य बाजारपेठ गजबजून गेली. उमेदवारांच्या अर्जांवरील आक्षेपांमुळे काही दिवस थंडावलेला प्रचार आता पुन्हा जोमात सुरू झाला असून रॅली, कोपरा सभा, रिक्षावरील स्पीकर, डिजिटल स्क्रीन असलेल्या व्हॅनमुळे पर्यटननगरी राजकीय वातावरणाने ढवळून निघाली आहे.
आज शहराच्या मुख्य बाजारपेठेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील शिंदे, प्रभाग क्रमांक तीनमधील विमल पार्टे व विशाल तोष्णीवाल तसेच प्रभाग क्रमांक पाचमधील अपर्णा सलगरे व ॲड. संजय जंगम यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला, तर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस हे हेवेदावे नव्हे तर विकासाला प्राधान्य देणारे राजकारण करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मागील आठ वर्षांत चुकीच्या नेतृत्वामुळे शहर विकासापासून वंचित राहिले असून या काळातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठोस प्रयत्न केले जातील, असे सुनील शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्यास पुढील पाच वर्षांत नावीन्यपूर्ण योजना राबवून शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल तसेच स्थानिक युवकांच्या रोजगाराला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही पक्षाचे तौफिक पटवेकर यांनी दिली. या रॅलीला बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Comments
Post a Comment