माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे; कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न – प्रकाश शिंदे
माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे; कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न – प्रकाश शिंदे
सातारा | प्रतिनिधी
सावरी ता. जावली येथे उघडकीस आलेल्या ड्रग्स तस्करी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसून काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे, निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठाम आरोप ठाण्याचे नगरसेवक तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणातून शिंदे कुटुंबाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली.
प्रकाश शिंदे यांनी सांगितले की, सावरी येथे ड्रग्स संदर्भातील गंभीर घटना घडली असून त्यात अनेक कोटींचा मुद्देमाल जप्त करत काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाशी आपला दूरान्वयानेही संबंध नसताना काँग्रेस व उबाठा गटातील काही नेते जाणीवपूर्वक आपले नाव गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी एमडी ड्रग्सचा साठा सापडला ती जमीन गोविंद नावाच्या शेतकऱ्याच्या मालकीची असून तो कारखाना किंवा ती जमीन आपल्या मालकीची नाही, तसेच त्या जागेशी आपला कोणताही संबंध नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे पुढे म्हणाले की, पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा टाकला ती जागा आपल्या मालकीच्या जमिनीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. आपल्या जमिनीचा सातबारा क्रमांक 17/1 असून छापा पडलेल्या जमिनीचा क्रमांक 4/1 आहे. यासंदर्भात आरोप करण्यापूर्वी उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वस्तुस्थितीची माहिती घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. आमची वडिलोपार्जित जमीन सातबारा क्रमांक 30/10 असून त्या जमिनीपासून सदर घटना तब्बल 15 किलोमीटर अंतरावर घडली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आपल्या जमिनीवर कोणतेही फाईव्ह स्टार हॉटेल उभारले जाणार नसून कृषी पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आमची काही जागा रणजीत शिंदे यांना विकण्यात आली असून त्याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. रणजीत शिंदे गावातच असून ते कुठेही फरार नाहीत, हेही त्यांनी ठामपणे सांगितले. पोलिसांच्या चौकशीतून अनेक बाबी स्पष्ट झाल्या असून तरीही केवळ राजकीय आकसापोटी आमच्यावर आरोप केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकारातून आपल्या कुटुंबाची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून असे आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार आहे. आरोप मागे न घेतल्यास अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशाराही प्रकाश शिंदे यांनी दिला. दरम्यान, या ड्रग्स प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना कठोर शिक्षा व्हावी, तसेच या प्रकरणातील इतर आरोपींनाही तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
Comments
Post a Comment