ग्रामीण महाराष्ट्रातील पहिला ‘बोपर्डी फेस्टिवल’ उत्साहात संपन्न; महिला बचत गटांच्या कौशल्याला मिळाले हक्काचे व्यासपीठ

ग्रामीण महाराष्ट्रातील पहिला ‘बोपर्डी फेस्टिवल’ उत्साहात संपन्न; महिला बचत गटांच्या कौशल्याला मिळाले हक्काचे व्यासपीठ

बोपर्डी प्रतिनिधी —

 बोपर्डी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेला अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम ‘बोपर्डी फेस्टिवल’ मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून यशस्वीपणे पार पडला. शुक्रवार, २६ डिसेंबर ते रविवार, २८ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेला हा फेस्टिवल ग्रामीण महाराष्ट्रातील पहिलाच अशा स्वरूपाचा उपक्रम ठरला असून, ग्रामविकासाच्या दिशेने एक आदर्श वस्तुपाठ निर्माण करणारा ठरला आहे.

ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवात महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला. महोत्सवाच्या आधी स्वयं सहाय्यता बचत गटांना विविध लघुउद्योग, उत्पादन प्रक्रिया आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग करत बचत गटांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू आणि इतर उत्पादने फेस्टिवलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिली. स्थानिक नागरिकांसह परिसरातील ग्रामस्थ आणि पाहुण्यांकडून या स्टॉल्सना मोठा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे महिलांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महोत्सवाचे भव्य उद्घाटन माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी सरपंच शंकर (बापू) गाढवे यांनी प्रास्ताविकात महोत्सवामागील भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली, तर गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली. आपल्या भाषणात खासदार नितीन काका पाटील यांनी बोपर्डी ग्रामपंचायतीच्या कार्याचे आणि या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक करत, अभियानात ग्रामपंचायतीने घेतलेली मेहनत निश्चितच यशस्वी ठरेल आणि त्याचे फळ बक्षीस स्वरूपात मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

बोपर्डी ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या दर्जेदार कामकाजाची आणि अभियानातील आघाडीची दखल घेत, ग्रामपंचायत अधिकारी श्री. शंकर चिकटूळ यांचा यावेळी खासदार नितीन काका पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनांमुळेच ‘बोपर्डी फेस्टिवल’सह विविध विकासात्मक उपक्रम प्रभावीपणे राबवले जात असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

हा संपूर्ण महोत्सव यशस्वी करण्यासाठी सरपंच शंकर (बापू) गाढवे व त्यांच्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी कर्मचारी, सी.आर.पी., ग्रामसंघ, आशा सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे परिश्रम घेतले. सामूहिक प्रयत्न, नियोजन आणि लोकसहभाग यामुळे ‘बोपर्डी फेस्टिवल’ हा केवळ उत्सव न राहता ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणाचा प्रभावी मंच ठरला असून, इतर ग्रामपंचायतींसाठीही तो प्रेरणादायी ठरणार आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl