नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या तत्पर हस्तक्षेपाने महाबळेश्वरचा पाणीपुरवठा सुरळीत; दिवसाआडचा निर्णय अखेर रद्द
नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या तत्पर हस्तक्षेपाने महाबळेश्वरचा पाणीपुरवठा सुरळीत; दिवसाआडचा निर्णय अखेर रद्द
महाबळेश्वर प्रतिनिधी , ता. २७ —
महाबळेश्वर नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून थकबाकीच्या कारणावरून गंभीर वादात अडकला होता. संबंधित प्राधिकरणाकडून वारंवार पाणीपुरवठा बंद केला जात असल्याने शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती, तर पालिकेचे दैनंदिन नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. विशेष म्हणजे ऐन पर्यटन हंगामात पाणीपुरवठा खंडित होत असल्याने पर्यटकांमध्येही नकारात्मक संदेश जात होता आणि महाबळेश्वरच्या पर्यटन प्रतिमेला धक्का बसत असल्याची तीव्र चिंता व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर पालिकेचे प्रशासक योगेश पाटील यांच्यावर मोठा प्रशासकीय ताण निर्माण झाला होता. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मध्यंतरी मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनीही पुढाकार घेत मुंबईतील मंत्रालयात संबंधित प्राधिकरण व खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठका आयोजित केल्या होत्या. मात्र, अपेक्षित गतीने ठोस निर्णय न झाल्याने प्रत्यक्ष परिस्थितीत फारसा बदल झाला नव्हता आणि नागरिकांची अस्वस्थता कायम होती.
दरम्यान, पुन्हा एकदा महाबळेश्वरचा पाणीपुरवठा दिवसाआड करण्याचा निर्णय जाहीर होताच शहरात नाराजीची लाट उसळली. या निर्णायामुळे नागरिकांसह व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित घटकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. अशा संवेदनशील परिस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी अद्याप अधिकृत पदभार स्वीकारलेला नसतानाही शहरातून येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेतली.
नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासक योगेश पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून सखोल चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस हस्तक्षेप केला. त्यांच्या या प्रयत्नांनंतर अखेर या हंगामातील दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द करण्यात आला. २७ ते ३१ डिसेंबरदरम्यान नियोजित असलेला दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करून २८ डिसेंबरपासून शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी बैठकीनंतर व्हॉट्सॲपद्वारे जाहीर केली.
या निर्णयामुळे शहरवासीयांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून, नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या तत्परतेचे आणि सकारात्मक भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. ऐन पर्यटन हंगामात निर्माण झालेला पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न तातडीने सोडवण्यात आल्याने नागरिकांसह पर्यटन व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, ‘महाबळेश्वर न्यूज’ या व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि प्रतिष्ठित नागरिक विविध स्थानिक प्रश्नांवर सातत्याने चर्चा करत असून, पाणीपुरवठ्यासारख्या गंभीर प्रश्नावर एकत्रित आवाज उठवण्यात या समूहाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्थानिक समस्यांसाठी हे व्यासपीठ प्रभावी ठरत असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर सकारात्मक दबाव निर्माण करण्याचे काम या माध्यमातून सुरू आहे.
Comments
Post a Comment