प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे क्षेत्र महाबळेश्वर रस्ता पुन्हा ठप्प; पर्यटकांचा संयम सुटण्याच्या मार्गावर
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे क्षेत्र महाबळेश्वर रस्ता पुन्हा ठप्प; पर्यटकांचा संयम सुटण्याच्या मार्गावर
✍️जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी —
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली असून क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर पुन्हा एकदा तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः क्षेत्र महाबळेश्वरमधून डचेस रोडने महाबळेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावर शैक्षणिक सहलींच्या बस, खासगी वाहने आणि पर्यटकांची वाहने एकाच वेळी आल्याने संपूर्ण रस्ता तासन्तास ठप्प राहण्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या कोंडीचा फटका केवळ पर्यटकांनाच नव्हे तर स्थानिक नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांनाही बसत आहे.
या परिस्थितीतून मार्ग काढणे अवघड नाही, असे असताना प्रशासनाची उदासीनता अधिकच खटकणारी ठरत आहे. क्षेत्र महाबळेश्वरमधून डचेस रोडने शैक्षणिक सहली थेट महाबळेश्वरकडे सोडणे, तसेच महाबळेश्वरकडे जाणाऱ्या बसेस एका ठराविक मार्गाने आणि बाहेर पडण्यासाठी वेगळा मार्ग वापरण्याचे साधे नियोजन केल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न सहज सुटू शकतो. एकमार्गी वाहतूक, वेळापत्रकानुसार बस सोडणे आणि पोलिसांचे सक्रिय नियोजन केल्यास कोंडी टाळता येऊ शकते, हे वारंवार निदर्शनास आणून दिले जात असतानाही प्रशासन पूर्णपणे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.
पर्यटनावर अवलंबून असलेल्या महाबळेश्वरसारख्या ठिकाणी अशी बेजबाबदार भूमिका केवळ नागरिकांची गैरसोय करणारी नाही, तर पर्यटनाच्या प्रतिमेलाही धक्का देणारी आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना तासन्तास रस्त्यावर अडकून राहावे लागल्याने नाराजी वाढत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. गर्दी वाढण्याआधीच ठोस वाहतूक नियोजन न केल्यास येत्या नववर्षात ही कोंडी आणखी भीषण होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने डोळे उघडून जबाबदारीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.
Comments
Post a Comment