केळघर घाटात जीविताला धोका कायम; संरक्षण कठड्यांच्या नावाखाली धोकादायक डागडुजी

केळघर घाटात जीविताला धोका कायम; संरक्षण कठड्यांच्या नावाखाली धोकादायक डागडुजी

महाबळेश्वर प्रतिनिधी —

साताऱ्यावरून महाबळेश्वरकडे येणारा मुख्य आणि अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा केळघर घाट सध्या नागरिक, प्रवासी आणि पर्यटकांच्या जीवाशी खेळ करणारा ठरत आहे. रोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या घाटातील रस्ता अरुंद असून अनेक ठिकाणी संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. या गंभीर समस्येबाबत यापूर्वी ‘माझगाव माझी बातमी’कडून वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाकडून तात्पुरती डागडुजी करण्यात आली, मात्र ही डागडुजीच आता नव्या धोक्याचे कारण ठरत असल्याचे चित्र आहे.

डागडुजी करताना संरक्षण कठड्यांना पायऱ्यांचे स्वरूप देण्यात आले आहे. अशा प्रकारे पायऱ्यांसारखे बनवलेले कठडे अपघाताच्या वेळी वाहन थांबवतील की वाहन थेट त्या पायऱ्या चढून दरीत कोसळेल, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या तथाकथित संरक्षण कठड्यांची उंची अवघी एक ते दीड फूट आहे. घाट रस्त्यावरील वेग, धुके, पावसाळ्यातील निसरडे रस्ते आणि अचानक वळणे लक्षात घेता ही उंची कोणत्याही प्रकारे सुरक्षित म्हणता येणार नाही.

पर्यटकांचे वाहन, खासगी कार, एसटी बस, मालवाहतूक करणारी वाहने अशा सर्वांसाठी हा घाट अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत किरकोळ धक्का बसला तरी वाहन थेट दरीकडे झुकण्याची भीती कायम आहे. संरक्षण कठड्यांचा मूळ उद्देशच वाहनाला थांबवणे आणि प्रवाशांचे प्राण वाचवणे हा असताना, जर तेच कठडे अपघाताला आमंत्रण देत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.

अभियंत्यांनी रस्ते सुरक्षेचे प्राथमिक निकष, भारतीय रस्ते काँग्रेसचे मानक, घाट रस्त्यांची भौगोलिक रचना आणि संभाव्य अपघातांचा धोका यांचा विचार न करता अशी कामे केली असतील, तर शासनाच्या वतीने नियुक्त अभियंत्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. केवळ तात्पुरती मलमपट्टी करून जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे.

केळघर घाटात यापूर्वीही अपघातांच्या घटना घडलेल्या असून भविष्यात मोठा अनर्थ टाळायचा असेल तर मजबूत, मानकांनुसार उंच आणि सलग संरक्षण कठडे तातडीने बसवणे आवश्यक आहे. अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर जागे झालेले प्रशासन आणि चौकशी समित्या या सगळ्याला अर्थ उरणार नाही. नागरिक, प्रवासी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी केळघर घाटातील धोकादायक डागडुजी थांबवून कायमस्वरूपी आणि दर्जेदार उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl