मुख्य बाजारपेठेतील सुशोभीकरण ठरतेय जीवघेणे; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघाताचा धोका वाढला
मुख्य बाजारपेठेतील सुशोभीकरण ठरतेय जीवघेणे; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघाताचा धोका वाढला
महाबळेश्वर प्रतिनिधी —
महाबळेश्वर शहराच्या मुख्य बाजारपेठेत सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ आणि बेफिकीर कारभारामुळे रस्त्यालगत तसेच पादचारी मार्गावर अनेक ठिकाणी चेंबर उघडेच ठेवण्यात आले असून, हे थेट दुर्घटनेस आमंत्रण ठरत आहे.
महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ ही शहरातील सर्वाधिक वर्दळीची जागा आहे. दररोज हजारो पर्यटक, स्थानिक नागरिक, व्यापारी, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक याच परिसरातून ये–जा करतात. अशा ठिकाणी कोणतीही संरक्षक व्यवस्था न करता चेंबर उघडे ठेवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश, कोणतेही सूचना फलक किंवा अडथळे नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
या गंभीर समस्येबाबत नागरिक, व्यापारी आणि स्थानिक प्रतिनिधींनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या असल्याचे सांगितले जाते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असून, तात्पुरते झाकण, संरक्षक जाळी किंवा इशारा फलक लावण्यासही विभागाने गांभीर्य दाखवलेले नाही, असा आरोप केला जात आहे.
दरम्यान, सुशोभीकरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अनेक ठिकाणी काम अर्धवट अवस्थेत असून त्यामुळे नागरिकांना रोजचा त्रास सहन करावा लागत आहे. नियोजनाचा अभाव, अधिकाऱ्यांची मनमानी आणि उत्तरदायित्व नसल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
उघड्या चेंबरमुळे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन सर्व उघडे चेंबर बंद करावेत, योग्य संरक्षक उपाययोजना कराव्यात आणि कामाची गुणवत्ता सुधारावी, अशी ठाम मागणी केली जात आहे. अन्यथा नागरिक, व्यापारी आणि स्थानिक संघटना तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment