आंबेनळी घाटात भीषण अपघात; टाटा नेक्सन १०० फूट दरीत कोसळली, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
आंबेनळी घाटात भीषण अपघात; टाटा नेक्सन १०० फूट दरीत कोसळली, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
महाबळेश्वर :
आंबेनळी घाटात आज भीषण अपघात झाला असून टाटा नेक्सन कार सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. वळणदार रस्ता आणि उताराच्या भागात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर सरजन रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. खोल दरी, घनदाट जंगल आणि अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्य करताना अडचणी येत असूनही रेस्क्यू पथकांनी दोरखंड, सुरक्षासाधने आणि आवश्यक उपकरणांच्या साहाय्याने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू केले आहे.
अपघातग्रस्त वाहनात किती प्रवासी होते आणि त्यांची स्थिती काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचे काम सुरू आहे.
आंबेनळी घाटात यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या असून वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची सविस्तर माहिती आणि जखमींबाबतचा अहवाल बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
Comments
Post a Comment