वेंगळे गावात जननी सुकाई देवीची यात्रा उत्सवमय — पारंपारिक सोहळ्यांना भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती अपेक्षित
वेंगळे गावात जननी सुकाई देवीची यात्रा उत्सवमय — पारंपारिक सोहळ्यांना भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती अपेक्षित
तापोळा प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील मौजे वेंगळे गावाच्या ग्रामदैवत श्री जननी सुकाई देवीची पारंपारिक यात्रा मार्गशीर्ष कृष्ण ३, शनिवार दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात साजरी होत आहे. नवसाला पावणारी जागृत देवता म्हणून जननी देवी प्रसिद्ध असून यात्रेदिवशी परिसरातून आणि बाहेरगावातूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी वेगळे येथे दाखल होतात. आकर्षक मंदिर, भव्य सजावट आणि पारंपारिक विधी यांनी युक्त असलेली ही यात्रा तालुक्यातील प्रमुख धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते.
वेंगळे येथील श्री जननी देवीचे मंदिर भव्य, आकर्षक आणि आध्यात्मिक तेजाने उजळलेले असून यात्रेच्या मुहूर्तावर येथे नवनवीन विद्युत रोषणाई, फुलांचे तोरण, सुशोभित मंडप आणि पारंपारिक ढोलताशांच्या निनादात भक्तिमय वातावरण निर्माण होते. यात्रेदिवशी विभागातील विविध देवस्थानांच्या पालख्या येथे दाखल होणे हा सोहळ्याचा विशेष सोहळा मानला जातो. उतव्याचा उतेश्वर, आहिरचा केदारेश्वर, तापोळ्याची पद्मावती देवी, वानवली आहिरेची काळेश्वरी देवी, सौदरीची गवरजाई देवी, कुरोशीचा भैरवनाथ, गोगव्याचा भैरवनाथ, रामेघरची वाघजाई देवी आणि वाकीची नवलाई देवी या अनेक देवदेवतांच्या पालख्या यात्रेला दिव्यता आणतात.
यात्रेच्या निमित्ताने ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत गावातील पालखी मिरवणुकीने उत्सवाला सुरुवात होणार आहे. रात्री ८ वाजता देवीची आरती, त्यानंतर नवस व लेझीम कार्यक्रम, छबिना, गोंधळ, स्वागत सत्कार आणि कमलराणी कराडकर यांच्या तमाशा कार्यक्रमाने रात्री रंगत वाढणार आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम रात्रीपासून पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे.
यात्रेचा उत्सव पुढील दिवशी, रविवार दि. ७ डिसेंबरलाही सुरू राहील. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत तमाशा कार्यक्रम, दुपारी ३ ते सायंकाळी ५ दरम्यान कुस्त्यांचा जंगी फड आणि संध्याकाळी ५ वाजता रिंगण तळी भरणे हा पारंपारिक सोहळा पार पडणार आहे. या सर्व कार्यक्रमांची रूपरेषा यात्रा समितीने जाहीर केली आहे.
यात्रेसाठी गावकऱ्यांकडून व्यापक तयारी करण्यात आली असून सर्व व्यवस्था सुरळीत राहाव्यात यासाठी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. मोठ्या संख्येने भाविकांनी वेगळे येथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, अशी विनंती ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. पारंपारिकता, भक्तीभाव आणि सांस्कृतिक वैभव यांचा संगम असलेली ही यात्रा यंदाही भव्यदिव्य वातावरणात पार पडणार आहे.
Comments
Post a Comment