मानवी वस्तीत बिबट्या दिसल्यास घाबरू नका; तात्काळ वन विभागाशी संपर्क साधा — पालकमंत्री शंभूराज देसाई
मानवी वस्तीत बिबट्या दिसल्यास घाबरू नका; तात्काळ वन विभागाशी संपर्क साधा — पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा प्रतिनिधी , दि. २५ —
जिल्ह्यात मानवी वस्तींमध्ये बिबट्यांचा वाढता वावर ही गंभीर आणि चिंतेची बाब असून अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ वन व वन्यजीव विभागाशी संपर्क साधावा, असे स्पष्ट आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. बिबट्यांचा मानवी वस्तीत होणारा वावर कमी करण्यासाठी वन विभाग व वन्यजीव विभागाने समन्वयाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
पालकमंत्री कार्यालयात मानवी वस्तीत बिबट्यांच्या वावराबाबत करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते (दूरदृष्य प्रणालीद्वारे), कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, ज्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर आढळून आला आहे, त्या गावांमध्ये तातडीने ग्रामसभा घेण्यात याव्यात. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व वन विभागाचे कर्मचारी यांनी एकत्रितपणे नागरिकांमध्ये जनजागृती करावी. बिबट्यांपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण कसे करावे, याबाबत स्पष्ट, सोप्या आणि व्यवहार्य मार्गदर्शक सूचना तयार करून त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. अफवा, घबराट किंवा चुकीच्या माहितीमुळे अनुचित घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांची माहिती नागरिकांना वेळोवेळी देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
चांदोली अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर अधिक प्रमाणात दिसून येत असल्याने या भागांमध्ये जास्तीचे पिंजरे लावावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसेच संवेदनशील ठिकाणी प्राधान्याने ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून बिबट्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवावी. यापूर्वी वन विभागाकडून राबविण्यात आलेल्या गावांच्या कडेला चर खांदण्याच्या जुन्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी पुन्हा करावी, जेणेकरून बिबट्यांचा मानवी वस्तीत प्रवेश रोखता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बिबट्यांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य असून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अलार्म सिस्टीम बसविणे, ड्रोन कॅमेरे आणि पिंजरे खरेदी करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. वन विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांचा विश्वास वाढवावा आणि कोणतीही जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीच्या प्रारंभी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Comments
Post a Comment