महाबळेश्वरमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा; डिजिटल युगातील ग्राहक हक्कांवर मार्गदर्शन
महाबळेश्वरमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा; डिजिटल युगातील ग्राहक हक्कांवर मार्गदर्शन
महाबळेश्वर प्रतिनिधी:
तहसील कार्यालय महाबळेश्वर व गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, बचत गट प्रतिनिधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात गिरिस्थान कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. नालबंद सर यांनी ग्राहकांचे हक्क व कर्तव्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहकांनी केवळ खरेदीपुरते मर्यादित न राहता जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका बजावली पाहिजे, असे सांगत त्यांनी भेसळ, जास्त दर आकारणी, फसवणूक यांसारख्या बाजारातील शोषणाच्या प्रकारांवर प्रकाश टाकला. ‘जागो ग्राहक जागो’ या उपक्रमांतर्गत डिजिटल न्याय, ई-कॉमर्समधील फसवणूक, ऑनलाइन व्यवहारातील सावधगिरी तसेच तक्रार नोंदविण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रभावी उपाययोजनांबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
तहसीलदार श्री. सचिन म्हस्के यांनी डिजिटल न्याय प्रणालीमुळे ग्राहकांच्या तक्रारींचा जलद व कार्यक्षम निपटारा शक्य होत असल्याचे सांगितले. बाजारात ग्राहकांचे कशा प्रकारे शोषण केले जाते, याची विविध उदाहरणे देत त्यांनी नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत सदैव सजग राहण्याचे आवाहन केले. ग्राहक जागरूकता हीच शोषणाविरुद्धची सर्वात प्रभावी ढाल असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास श्री. सचिन म्हस्के (तहसीलदार), श्री. अनिल गवळी (पुरवठा निरीक्षण अधिकारी), श्री. आबाजी ढोबळे (मुख्य लिपिक, गिरिस्थान नगरपरिषद महाबळेश्वर), सौ. ऋतुजा कदम (पुरवठा निरीक्षक), श्री. वैभव पवार (पुरवठा लिपिक), श्री. विठ्ठल चव्हाण (वाहतूक नियंत्रक), श्री. भास्कर कोळी (पंचायत समिती महाबळेश्वर), श्री. लक्ष्मण येडलेवाड (गोदाम व्यवस्थापक), श्री. बापू शेलार (रास्त भाव दुकान तालुकाध्यक्ष), श्री. सचिन धोत्रे (महाबळेश्वर किराणा भुसार व्यापारी संघटना अध्यक्ष), सौ. अनुराधा शिंगरे (श्रद्धा महिला बचत गट, मेटतळे), श्री. नालबंद सर (गिरिस्थान कला व वाणिज्य महाविद्यालय), श्री. जितेंद्र कारंडे (पत्रकार, दक्षक्रांती), श्री. पी. आर. माने (प्राचार्य, गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय) तसेच सौ. रोहिणी बगाडे (शिक्षिका, गिरिस्थान प्रशाला) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. वैभव पवार यांनी मानले. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये ग्राहक हक्कांबाबत जागृती निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment