रामासोबत बंधू, रावण एकटा; महाबळेश्वरच्या निकालातून संघटनबळाचा स्पष्ट धडा

रामासोबत बंधू, रावण एकटा; महाबळेश्वरच्या निकालातून संघटनबळाचा स्पष्ट धडा

✍️ विलास काळे,

महाबळेश्वर, ता. (प्रतिनिधी) —
महाबळेश्वर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शिंदे यांनी १४५१ मतांच्या भरघोस फरकाने विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले. हा विजय केवळ मतांचा आकडा नसून, संघटन, कुटुंबातील एकजूट आणि नियोजनबद्ध प्रचार यांचा परिणाम असल्याचे चित्र या निकालातून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, विरोधी गटातील अंतर्गत मतभेद आणि घरातील वाद थेट निवडणूक रिंगणात उतरल्याने त्यांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागली.

सुनील शिंदे यांच्या प्रचारात संपूर्ण शिंदे कुटुंब एकदिलाने उतरले होते. धाकटे बंधू डि. एल. शिंदे, नाना शिंदे यांच्यासह सख्खे व चुलत बंधू प्रत्येक प्रभागात सक्रिय होते. कोणत्या प्रभागात कोण जबाबदारी घेणार, मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे, प्रचाराचा सूर कसा ठेवायचा याचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. या एकजुटीचा फायदा थेट मतपेटीत दिसून आला आणि नगराध्यक्षपदाच्या लढतीत सुनील शिंदे यांना निर्णायक आघाडी मिळाली.

याउलट, नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे यांच्या गटात घरातील मतभेद उघडपणे समोर आले. प्रभाग क्रमांक ८ मध्ये त्यांची पत्नी व माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे निवडणूक लढवत होत्या, तर त्यांच्याच विरोधात जाऊ शुभांगी शिंदे उभ्या राहिल्या. या थेट भावकी संघर्षाचा फटका दोघींनाही बसला आणि दोन्ही उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. प्रभाग क्रमांक ४ मध्येही किरण शिंदे हे कुमार शिंदे यांच्या विरोधात उभे होते. या लढतीत किरण शिंदे पराभूत झाले, तर कुमार शिंदे वैयक्तिक विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. मात्र, हा वैयक्तिक विजय नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उपयोगी ठरू शकला नाही.

घरातील फाटाफूट, परस्पर विरोधी प्रचार आणि अंतर्गत संघर्ष यामुळे संपूर्ण गट विस्कळीत झाला आणि त्याचा थेट परिणाम नगराध्यक्षपदाच्या निकालावर झाला. राजकारणात केवळ व्यक्तीगत ताकद पुरेशी नसून संघटनबळ, एकजूट आणि विश्वास यांचे महत्त्व किती मोठे असते, हे महाबळेश्वरच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

या निकालाची तुलना अनेकांनी रामायणातील दाखल्याशी केली आहे. रावण पराक्रमी असूनही एकटा पडला, तर प्रभू रामांसोबत लक्ष्मणांसह सर्व बंधू खंबीरपणे उभे राहिले म्हणून विजय मिळाला, असा संदर्भ चर्चेत आहे. ‘रामासोबत बंधू होते, रावण मात्र एकटाच’ ही म्हण महाबळेश्वरच्या राजकारणात प्रत्यक्षात उतरल्याचे अनेकांचे मत आहे. हा निकाल केवळ एका निवडणुकीचा नसून, भविष्यातील राजकारणासाठीही संघटनबळाचा मोठा धडा देणारा ठरला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl