पुसेगावातील बुडालेल्या व्यक्तीचा शोध; सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वरची उल्लेखनीय कामगिरी
पुसेगावातील बुडालेल्या व्यक्तीचा शोध; सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वरची उल्लेखनीय कामगिरी
महाबळेश्वर प्रतिनिधी –
पुसेगाव (ता. खटाव) येथील बुरकवाडी परिसरात बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर या बचाव पथकाला यश आले असून त्यांच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे पुसेगाव येथून मदतीचा कॉल प्राप्त होताच सह्याद्री ट्रेकर्सचे दीपक जाधव यांनी कोणताही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना संपर्क केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही वेळ न दवडता संपूर्ण पथक तात्काळ पुसेगाव येथील घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शोध मोहीम सुरू केली. पाण्याचा प्रवाह, परिसराची अवघड परिस्थिती आणि वेळेचे आव्हान असतानाही पथकाने अथक प्रयत्न सुरू ठेवले. अखेर काल दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात यश आले. या शोध मोहिमेमुळे नातेवाईकांना मोठा आधार मिळाला असून प्रशासनालाही पुढील कार्यवाही करणे सुलभ झाले.
या संपूर्ण मोहिमेत सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वरचे अध्यक्ष संजय जी. पारठे यांच्यासह दीपक जाधव, जितेंद्र कदम, सुहास बैलकर, सर्जेराव खुटेकर आणि अनिल पवार या जवानांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. याशिवाय स्थानिक ग्रामस्थ संतोष कदम यांनीही शोध मोहिमेत मोलाचे सहकार्य करत चांगला सहभाग नोंदवला.
या यशस्वी कामगिरीबद्दल पुसेगाव ग्रामस्थांसह संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांनी सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वरच्या पथकाचे मनापासून कौतुक केले असून संकटसमयी धावून येऊन केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहेत. समाजासाठी झटणाऱ्या या स्वयंसेवी बचाव पथकाच्या कार्यामुळे पुन्हा एकदा मानवतेचा आणि सेवाभावाचा आदर्श जनतेसमोर उभा राहिला आहे.
Comments
Post a Comment