महाबळेश्वर क्षेत्र–महाबळेश्वर रस्त्यावर संरक्षक रेलिंगची तातडीची गरज; दुर्लक्ष केल्यास मोठ्या अपघातांचा धोका
महाबळेश्वर क्षेत्र–महाबळेश्वर रस्त्यावर संरक्षक रेलिंगची तातडीची गरज; दुर्लक्ष केल्यास मोठ्या अपघातांचा धोका
क्षेत्र महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर क्षेत्र ते महाबळेश्वर या मुख्य मार्गावर संरक्षक रेलिंग नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. हा रस्ता अत्यंत अरुंद असून काही ठिकाणी खोल दरीलगत वळणदार असल्याने येथे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेषतः पर्यटन हंगामात या मार्गावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. खासगी वाहने, एसटी बस, मालवाहू वाहने यांची सतत ये-जा सुरू असते. रस्ता अरुंद असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आली की वाहतूक कोंडी निर्माण होते. अशा वेळी ट्रॅफिक सोडवताना चालकांना वाहन कडेला घ्यावे लागते. मात्र अनेक ठिकाणी संरक्षक रेलिंग नसल्याने वाहन थेट दरीत कोसळण्याचा धोका कायम आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही या मार्गावर किरकोळ अपघात घडले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता असून त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. रात्रीच्या वेळी किंवा धुक्याच्या वातावरणात हा रस्ता अधिकच धोकादायक ठरतो. अपुरी प्रकाशव्यवस्था आणि रेलिंगचा अभाव यामुळे वाहनचालक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.
पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या प्रवेशमार्गावरच अशी स्थिती असणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणी मजबूत संरक्षक रेलिंग बसवावीत, तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक व वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जर लवकरात लवकर रेलिंग बसवण्यात आली नाहीत तर येत्या काळात होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेला प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा नागरिक व वाहनचालकांकडून दिला जात असून आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment