कोयना जलाशयात लोकसहभागातून दीड लाख मत्स्यबीज; मत्स्यसंपदेच्या पुनरुज्जीवनासह शेकडो मच्छीमारांना दिलासा
कोयना जलाशयात लोकसहभागातून दीड लाख मत्स्यबीज; मत्स्यसंपदेच्या पुनरुज्जीवनासह शेकडो मच्छीमारांना दिलासा
बामणोली प्रतिनिधी, दि. १७ :
जावळी तालुक्यातील जीवन मच्छीमार सहकारी संस्था शेंबडी यांच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून कोयना जलाशयात तब्बल दीड लाख मत्स्यबीज सोडण्यात आले. या उपक्रमामुळे धोक्यात आलेली मत्स्यसंपदा पुन्हा समृद्ध होण्यास मदत मिळणार असून उत्पादन घटल्याने अडचणीत सापडलेल्या शेकडो मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाला मोठा आधार मिळणार आहे. लोकसहभागातून मत्स्यबीज सोडण्यात आलेले हे सातारा जिल्ह्यातील पहिलेच धरण ठरले आहे.
या कार्यक्रमास मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप सुर्वे, मत्स्य व्यवसाय अधिकारी विजय देवकर, शासकीय मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे आशिष बाबर, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे, अक्षय करमळकर, एमटीडीसीचे गोविंद खवणेकर यांच्यासह मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव उपस्थित होते. मुनावळे (ता. जावळी) येथील कोयना धरणाच्या काठावर हा उपक्रम राबविण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील गोड्या पाण्यातील माशांचे सर्वात मोठे कोठार म्हणून कोयना जलाशयाकडे पाहिले जाते. देशी तसेच प्रमुख कार्प जातीतील चवदार माशांमुळे कोयनेचे मासे राज्यभर ओळखले जातात. मात्र गेल्या काही वर्षांत काही प्रजाती दुर्मिळ झाल्या असून कटला व मरळसारख्या प्रमुख कार्प जातींचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटले होते. याचा थेट परिणाम मासेमारी उत्पादनावर होऊन शेकडो मच्छीमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
अनेक वर्षांनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कोयना जलाशयात मत्स्यबीज सोडण्यात आले. सातारा मत्स्यविभाग, वनविभाग आणि जीवन मच्छीमार सहकारी संस्थेच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. यामुळे आगामी काळात कोयनेतील मत्स्यउत्पादन वाढण्यास चालना मिळेल आणि पुन्हा एकदा राज्यभरातील खवय्यांना कोयनेचे चवदार मासे चाखता येणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शासनाच्या माध्यमातून कोयना जलाशयातील मच्छीमार बांधवांना मासेमारीचे मासिक परवाने देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Comments
Post a Comment