महाबळेश्वर पालिका निवडणुकीसाठी सज्ज यंत्रणा; २० डिसेंबरला मतदान, १२,७०४ मतदार ठरवणार नगरपरिषदेचे भवितव्य
महाबळेश्वर पालिका निवडणुकीसाठी सज्ज यंत्रणा; २० डिसेंबरला मतदान, १२,७०४ मतदार ठरवणार नगरपरिषदेचे भवितव्य
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने येत्या २० डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेबाबत प्रशासनाने सविस्तर तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठी शहरात एकूण १२,७०४ मतदार नोंदणीकृत असून यामध्ये ६,१०५ पुरुष, ६,५९८ महिला व १ इतर मतदारांचा समावेश आहे. मात्र मतदार यादीत २०९ मयत मतदार तसेच सुमारे ८० दुबार नोंदी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महाबळेश्वर नगरपरिषद क्षेत्रातील १० प्रभागांसाठी एकूण १७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी २८ बॅलेट युनिट व १७ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा व यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी मनुष्यबळाचीही व्यापक तयारी करण्यात आली आहे. निवडणूक कामकाजासाठी २ झोनल अधिकारी, १७ मतदान केंद्रांसाठी १७ केंद्राध्यक्ष व ३ राखीव केंद्राध्यक्ष असे एकूण २० केंद्राध्यक्ष, ८० मतदान कर्मचारी आणि २० पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सुमारे १२२ कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावणे सुलभ व्हावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्यात येणार आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, झोनल अधिकारी, केंद्राध्यक्ष तसेच सर्व नियुक्त कर्मचारी कार्यरत राहणार असून मतदारांनी निर्भय व शांत वातावरणात मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महाबळेश्वरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीकडे आता शहरासह परिसराचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment