वीस वर्षांचा दुरावा संपला; मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र, मराठी राजकारणाला नवे वळण
वीस वर्षांचा दुरावा संपला; मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र, मराठी राजकारणाला नवे वळण
मुंबई प्रतिनिधी —
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक आणि निर्णायक घडामोड घडली. तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येत त्यांनी आपल्या दोन पक्षांची राजकीय युती अधिकृतपणे जाहीर केली. बुधवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती जाहीर करण्यात आली असून ही युती आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच इतर महानगरपालिका निवडणुकांसाठी असेल, असे स्पष्ट करण्यात आले.
२००५ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केल्यानंतर ठाकरे कुटुंबातील हा दुरावा महाराष्ट्राने दीर्घकाळ पाहिला. त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये मराठी मते विभागली गेली आणि त्याचा राजकीय फायदा इतर पक्षांना झाला. आजच्या घोषणेमुळे तो अध्याय संपल्याचे संकेत मिळाले असून “एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी” हा संदेश दोन्ही नेत्यांनी दिला.
या युतीमागचा मुख्य उद्देश मुंबईसह सात महानगरपालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा असून मराठी मतदारांचा एकत्रित आणि मजबूत पाया उभा करणे, असे सांगण्यात आले. प्राथमिक करारानुसार शिवसेना (UBT) सुमारे १४५ ते १५० जागांवर, तर मनसे ६५ ते ७० जागांवर निवडणूक लढवेल, अशी सीट वाटपाची रूपरेषा ठरल्याची माहितीही देण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी अस्मिता, स्थानिक तरुणांचे प्रश्न, रोजगार आणि शहरांच्या स्वायत्ततेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात येणार असल्याचे संकेत या घोषणेतून मिळाले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही युती केवळ एक निवडणूक आघाडी नसून महाराष्ट्रातील सत्तासमीकरण बदलू शकणारी मोठी घडामोड आहे. विशेषतः मुंबईत भाजप आणि महायुतीसमोर ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद मोठे आव्हान ठरू शकते. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गुप्त चर्चांनंतर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून, पूर्वीचे मतभेद मागे टाकून दोन्ही नेते नव्या रणनीतीसह मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
बीएमसीसह इतर २९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये ही युती कशी कामगिरी करते, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, ठाकरे बंधूंच्या या पुनर्मिलनामुळे मराठी राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
Comments
Post a Comment