महाबळेश्वर पालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; २० रोजी मतदान, २१ रोजी मतमोजणी

महाबळेश्वर पालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; २० रोजी मतदान, २१ रोजी मतमोजणी

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून येत्या २० डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया तसेच २१ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी प्रक्रिया निर्विघ्न, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वस्तरावर व्यापक तयारी सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने नियोजनाला गती दिली असून निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक बाबीवर काटेकोर लक्ष दिले जात आहे.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सीईओ योगेश पाटील आणि पोलीस निरीक्षक सांडभोर यांनी शहरातील विविध मतदान केंद्र परिसरांची प्रत्यक्ष पाहणी करत सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियोजन, मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदान साहित्याची साठवणूक व वितरण याबाबत सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या उपाययोजना राबवण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी, तसेच कोणतीही आरोग्यविषयक अडचण उद्भवल्यास तत्काळ उपाययोजना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले.

मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली, नियंत्रण कक्षामार्फत आणि अधिकृत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आणि दक्षतेने पार पाडाव्यात, असे निर्देश देत २० डिसेंबर रोजी मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या या सखोल तयारीमुळे महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl